कर्करोगाशी अयशस्वी झुंज
चाळीसगाव : 'आयुष्य हे क्षणभंगुर असते' ही बाब खरोखरच सत्य आहे. कुणाचा शेवट कसा व कधी होईल. याची शाश्वती नाही. परंतु आयुष्याच्या शेवटी जाताना काहीजण प्रेरणादायी संदेश देऊन जातात. याची प्रचिती नुकतीच आली आहे. 'आज माझ्याकडे सर्व काही आहे. गाडी, बंगला, अधिकारी पती. मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा... छोट्या - छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा...तुलना करू नका...' मृत्युपूर्वी काही तास अगोदर समाजमाध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे. या पोस्टमुळे अनेकांचे डोळे पाणावले असून ती सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral)होत आहे.
२८ वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील ( prateeksha Patil Jalgaon ) यांची ही भावनिक पोस्ट आहे. २७ फेब्रुवारी रोजी त्यांचा कर्करोगाने दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या वर्षभरापासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. प्रतीक्षा या उच्च विद्याविभूषित होत्या. त्यांचे शिक्षण एमए डी.एड होते. जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची ही भावनिक पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली. समाजमाध्यमांवरील त्यांच्या पोस्टने अनेकांचे डोळे पाणावले.
आपल्या पोस्टमध्ये त्या पुढे लिहितात की, मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. परंतु मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना. त्याला जीवनाची किंमत कळते. तेव्हा छोट्या - छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा... जीवन जगा...असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा यांना कर्करोगाने गाठून इहलोकातून हिरावून घेतले.
शस्त्रक्रियेनंतर मृत्यूने गाठले
प्रतीक्षा पाटील यांचे लग्न वयाच्या २४ व्या वर्षी यावल वनविभागातील वनाधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाले होते. ते जळगाव येथेच वास्तव्यास होते. सुरुवातीला जिभेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले. तीन महिने उपचार सुरूच होते. मात्र, यानंतर जिभेला गाठ झाली. तपासणीदरम्यान गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाल्याने अवघे कुटुंब सुन्न झाले.
जीवघेण्या आजारालाही त्या सामोरे गेल्या. २० दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. यात त्यांची जीभ काढण्यात आली. त्यांचे वजन १० किलोने कमी झाले. आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २० दिवसांनंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठले.
0 Comments