राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
राजकीय वर्तुळात दोन आठवड्यात भुवया उंचावणाऱ्या घटना घडल्या. उपजिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन सेवेच्या लोकार्पण सोहळ्यात भाजप नेत्याने आमदारांचे भरभरून कौतुक केले तर २० फेब्रुवारी रोजी दोघांनी एकमेकांना भरविलेला 'पेढा' कुतूहलाचा विषय बनला आहे. विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध 'शड्डू' ठोकून असलेले भरभरून कौतुक अन् पेढा भरविण्यापर्यंत कसे जाऊ शकतात? या प्रकरणावर तर्कवितर्क सुरू झाले आहे.
आमदार रमेश बोरनारे (MLA Ramesh Bornare) यांच्या पुढाकारातून वैजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन सेवा सुरू झाली. गेल्या आठवड्यात हा कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमात सध्या ठाकरेसेनेत असलेले माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशींनी (Dr. Dinesh Pardeshi) उपस्थित राहून आमदार बोरनारे यांच्यावर 'स्तुतीसुमने' उधळली.
या प्रकरणाचा धुरळा उडालेला असतानाच २० फेब्रुवारी रोजी एका धार्मिक कार्यक्रमात आमदार बोरनारे व माजी नगराध्यक्ष डॉ. परदेशी पुन्हा आमनेसामने आले अन् पुन्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावेळीही डॉ. परदेशींनी बोरनारेंना 'पेढा' भरविण्यासाठी हात पुढे केला अन् तेवढ्यात तत्परतेने त्यांनीही आढेवेढे न घेता पेढा तोंडात घेतला. नाही म्हणायला त्यानंतर बोरनारेंनीही डॉ. परदेशींना पेढा भरविलाच. या कृतीने दोघेही सुखावले असतीलच.
विधानसभा निवडणुकीत उडालेला 'धुरळा' यानिमित्ताने का होईना. खाली बसू लागला आहे. दोघांचीही राजकारणात 'स्वच्छ' प्रतिमा तर आहेच, परंतु तेवढेच दबंग आणि मातब्बर आहेत. तत्कालीन राजकीय नेतृत्वानंतर हे दोघांचेही नेतृत्व 'उभारून' आले. आमदार बोरनारेंवर उधळलेल्या स्तुतीसुमनानंतर 'कटूता' आलेल्या राजकारणातील नवीन अध्यायाला सुरवात झाली. 'पेढा' प्रकरणानंतर जवळपास 'गोडवा' येऊन दुसऱ्या अध्यायला प्रारंभ झाला.
पेढ्याकडे केवळ पेढा म्हणून पाहिले जात नाही. पेढ्यालाही अख्यायिका आहे असं जाणकार सांगतात. कटूता आलेल्या संबंधात 'पेढ्या'ची महत्त्वाची भूमिका असते. असं म्हणतात. पेढ्याचा छुपा अर्थ आहे संबंधातील गोडवा. हा शब्दही तितकाच व्यापक आणि अर्थपूर्ण आहे. उभयतांनी एकमेकांस पेढे भरून यातून काय संदेश द्यायचा तो कार्यकर्त्यांना दिला. दोघांत निवडणुकीपासून आलेली कटूता हा पेढा संपवून टाकीन. असे अर्थही राजकीय वर्तुळात काढले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता हे दोन दबंग एकत्र आल्यास कुणाला अपूर्वाई वाटण्याचे कारण नाही.
तुझ्या गळा.. माझ्या गळा..
गुंफू सत्तेच्या माळा!
नाही म्हणायला डॉ. दिनेश परदेशी ठाकरेसेनेला 'जय महाराष्ट्र' करून भाजपच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहे. चर्चा असली तरी सत्यताही तेवढीच आहे. काही वाजल्याशिवाय आवाज होत नाही. त्यामुळे हालचाली सुरू असल्याशिवाय चर्चा होणार नाही. त्यामुळे आगामी काळात बोरनारे व डॉ. परदेशी महायुतीच्या मित्रपक्षातील सहकारी असणार आहे. विधानसभा निवडणुकीत एकमेकांना 'पाण्यात' पाहणाऱ्या दोघांनाही 'तुझ्या गळा..माझ्या गळा..गुंफू सत्तेच्या माळा' या ओळीप्रमाणे पुढील राजकीय वाटचाल करण्याचे ठरविल्याचे हे संकेत समजावे. असेच हे चित्र आहे.
वक्त का तकाजा!
राजकारणात कुणी कितीही एकमेकांचे हाडवैरी असा. परंतु शेवटी परिस्थिती काही गोष्टी घडवून आणतेच. त्याला कुणीच अपवाद नाही, तसे हे दोघेही नाही. याला 'वक्त का तकाजा' म्हणावा लागेल. दोघांत 'गोडवा' आल्याने कार्यकर्त्यांचेही चेहरे 'खुलले' आहे. एकंदरीतच वैजापूरच्या राजकारण पुन्हा आलबेल सुरू राहील. याचे हे संकेत आहे. कटूता आणि गोडवा या बाबी परिस्थितीवरच अवलंबून असतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
0 Comments