दोन लाखांचा ऐवज हिसकावला
देवदर्शनासाठी जात असलेल्या एका वाहनाला अडवून चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून दोन लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास नागपूर - मुंबई महामार्गावरील भग्गाव शिवारात घडली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिकंट हनुमंतआप्पा (रा.नेहरूनगर, चित्रदुर्ग, राज्य : कर्नाटक) हे व्यवसायाने चालक असून त्यांच्याकडे एक टेंपो ट्रॅव्हलर (के ए ११ - बी - ४१०१) असून यामध्ये ते प्रवासी घेऊन देवदर्शनासाठी जात असतात. दरम्यान ७ फेब्रुवारी रोजी त्यांनी चित्रकूट येथून के.एन. लोहित, विश्वनाथ पटेल बसन्ना, एन. सी. चंद्रशेखर, बमराज एन. सी., ईश्वरअप्पा पुरीअप्पा, जयरत्ना विश्वाअप्पा, दिव्या एन.सी. चंद्रशेखर, जी. एम.जयमाला, के. एन. मंजुळा, सरोजा, प्रकाश बसुराज शेट्टी (सर्व रा.विद्यानगर, चिञदुर्ग, राज्य कर्नाटक) या सर्व भाविकांना आपल्या वाहनात देवर्शनासाठी आणले होते.
१६ फेब्रुवारी रोजी वाहनातील सर्व भाविकांनी ओंकारेश्वर येथे दर्शन घेतले व पहाटे तीन वाजता ते कन्नड मार्गे वैजापूर व येथून पुढे शिर्डीला साईदर्शनाला जाण्यासाठी निघाले असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन तालुक्यातील भग्गाव ते बेलगाव शिवारादरम्यान पोहोचले. या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाची अर्टिगा कार त्यांच्या वाहनाला आडवी झाली.
या वाहनातून चौघेजण खाली उतरले. यापैकी एक जणाने ट्रॅव्हल्सचे चालक मनिकंट यांना 'कैसे गाडी चला रहा हैं ? सिधा नही चला सकता क्या ?' असा दम देत चालकाच्या बाजू असलेली खिडकीची काच फोडली व गाडीचा दरवाजा उघडून गाडी बंद केली. हा सर्व घटनाक्रम सुरू असताना अन्य तीन जण ट्रॅव्हल्समध्ये घुसले.
आत प्रवेश करताच त्या तिघांनी वाहनातील सर्व प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख १ हजार ४५० रुपये किंमतीचा ऐवज लुटला. ही लूट करून चोरट्यांनी आलेल्या वाहनातून घटनस्थळाहुन धूम ठोकली. याप्रकरणी टेंपो ट्रॅव्हल्स चालक मनिकंट हणमंतआप्पा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणेप्रमुखांची माणुसकी!
घटना घडताच वाहनातील सर्व प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत होते. या प्रवाशांत महिला व मुलींचा देखील समावेश होता. ट्रॅव्हल्स चालकाने वाहन लगेच वैजापूर पोलिस ठाण्यात नेऊन उभे केले. त्याने पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांना आपबीती सांगत चोरट्यांनी सर्व काही लुटून नेल्याचे सांगितले. त्यानंतर कौठाळे यांनीही क्षणाचाही विलंब न करता घडलेल्या घटनेचा गुन्हा दाखल करून घेतला. यानंतर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स चालकासह वाहनातील सर्व प्रवाशांना शहरातीलच एका हॉटेलमध्ये जेवू घातले. एवढ्यावरच न थांबता निरीक्षकांनी प्रवाशांच्या सायंकाळच्या जेवणाचीही तजवीज करून त्यांना पुढील प्रवासासाठी अर्थिक साह्य करून रवाना केले.
0 Comments