वादंग उठण्याची शक्यता
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत (Pradhanmantri Gramin Aswas Yojna) लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप करण्याच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. २२ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात होणार आहे. लोकप्रतिनिधी लोकशाहीचा कणा असतात. असं म्हणतात. परंतु अधिकाऱ्यांनी 'चलाखी' दाखवत लोकप्रतिनिधींची नावे कार्यक्रम पत्रिकेतून 'हद्दपार' केल्याचे समोर आल्याने हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या 'खोडसाळपणा'मुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
विविध पक्षांच्या राजकीय नेते मंडळीसह लोकप्रतिनिधी म्हणजे प्रशासनाच्या रथाची दोन चाके समजली जातात. परंतु आवास योजनेची कार्यक्रम पत्रिका पाहून ही रथाची चाके नव्हेतर या दोघांचे विळ्या - भोपाळ्याचे नाते आहे की काय? असं वाटल्याशिवाय राहत नाही. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना टप्पा -२ अंतर्गत वैजापूर तालुक्यात सुमारे १० हजार घरकुल मंजूर आहेत. या योजनेतंर्गत मंजूर लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व प्रथम हफ्ता वितरण कार्यक्रमाचे २२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता पंचायत समिती कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.
मात्र कार्यक्रम पत्रिकेवर गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर व सहायक गटविकास अधिकारी अक्षय भगत या दोघांचीच नावे असून तालुक्यातील लोकप्रतिनिधींची नावे नाहीत. वास्तविक पाहता राजकीय नेते मंडळी ही प्रशासकीय अधिकारी व जनता यामधील दुवा असतात. याशिवाय जनतेसाठी मंजूर सर्वच योजनेचे निर्णय हे राज्यशासन अर्थात मंत्रिमंडळच घेत असते.
स्थानिक आमदार हे राज्यशासनाचेच प्रतिनिधीत्व देखील करत असतात. मात्र कार्यक्रम पत्रिकेत गटविकास अधिकाऱ्यांना लोकप्रिनिधींचाच विसर पडला व त्यांची नावे वगळून आम्हीच या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक म्हणून असे भासवित असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. दरम्यान या पत्रिकेवरून सध्या चांगलेच वादंग उठल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
पुण्यात शाहांच्याहस्ते पत्र वाटप
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते पुणे येथे प्रातिनिधिक स्वरूपात राज्यातील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. याचवेळी राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायतीमध्येही हाच कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. एकीकडे राज्याचा कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्र्यांहस्ते पार पडत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र लोकप्रतिनिधींना कार्यक्रमासाठी बोलाविण्याचे औदार्य दाखविण्यात अधिकाऱ्यांनी कंजुषी दाखविली.
0 Comments