प्रकरण शेकण्याच्या भीतीने सारवासारव
छत्रपती संभाजीनगर - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकाची तोडफोड करून थेट रस्ता तयार केल्याचा धक्कादायक प्रकार साधारणतः १५ दिवसांपूर्वी समोर आला होता. व्यावसायिक फायद्यासाठी काहींनी हा प्रताप केला. परंतु प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच. 'त्या' व्यावसायिकांनी पुन्हा दुभाजकाची उभारणी करून सारवासारव केली. परंतु असे असले तरी वैजापूर शहरातील 'दुभाजकाची तोडफोड करा अन् पुन्हा बांधा' असाच संदेश या प्रकरणावरून मिळाला.
साधारणतः १५ दिवसांपूर्वी शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर - नाशिक महामार्गावरील करुणा निकेतन शाळेच्या परिसरात असलेले दुभाजक अगोदर जेसीबी यंत्राच्या साह्याने फोडण्यात आले. कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून काही दिवस आहे त्याच परिस्थितीत ठेवण्यात आले. याच परिसरातील काही उपद्व्यापी व्यावसायिकांनी व्यावसायिक फायद्यासाठी हा प्रताप करण्यात आल्याचे दिसून आले.
वर्दळीच्या महामार्गावरील दुभाजकाची खुलेपणाने तोडफोड करण्यात येऊनही कुठे 'हक ना बोंब' झाली नाही. हा अवैध रस्ता तयार केल्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील दुभाजक तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असा सूर वैजापुरकरांत उमटत होता.
विशेष म्हणजे दुभाजकाची तोडफोड केल्यानंतर महामार्ग प्राधिकरण मुग गिळून गप्प बसले होते. याबाबत 'दुभाजकाची तोडफोड' सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याशिवाय संबंधित महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचे सुतोवाच केले होते. परंतु कारवाई थंडबस्त्यात पडली. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला गेला.
दरम्यानच्या काळात फोडलेल्या दुभाजकातून वाहनांचे दळणवळण सुरुच होते. परंतु अचानककच फोडलेल्या दुभाजकाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. संबंधित व्यावसायिकास कुणाचा 'दट्टू' आला माहिती नाही. परंतु तोडफोड केलेल्या दुभाजकाची गपगुमानपणे दुरूस्ती हाती घेण्यात आली. गेल्या चार - पाच दिवसांतच पाहता - पाहता दुभाजक पूर्ववत करण्यात आले. भलेही कामाचा दर्जा पूर्वीसारखा नसला तरी ते उभारले. याचेच समाधान नागरिकांना आहे. एवढे मात्र खरे!
कुणीही उठतो अन्..!
एकंदरीतच वैयक्तिक फायद्यासाठी कुणीही उठतो अन् सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतो. स्वतःच्या फायद्यासाठी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे कितपत योग्य आहे ? मुळातच दुभाजक फोडण्यासाठी महामार्ग प्राधिकरण परवानगी देतच नाही. हे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भविष्यात अशा उपद्रवी व्यावसायिकांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
0 Comments