Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Valentine's Day | रक्तरंजित व्हॅलेंटाईन डे: प्रेयसीला संपवून पुरविले खड्ड्यात; 'तो' नराधम प्रियकर अटकेत

  नर्सचा दाबला गळा !


 लासूरस्टेशन: प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह शेतातील घरात पुरल्याचा अत्यंत खळबळजनक प्रकार 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी शुक्रवारी (दि.१४) उघडकीस आला. या प्रकरणातील पोलिसांनी संशयित प्रियकारास बेड्या ठोकल्या आहेत. मृत प्रेयसी ही जालना येथील रहिवासी आहे.

मोनिका सुमित निर्मळ (३०, रा. जमुनानगर, जालना) असे मृत तरुणीचे तर शेख इरफान शेख पाशा (३५ रा. लासूरस्टेशन) असे मारेकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी विचारणा करताच मोनिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव इरफान शेख याने केला. परंतु तपासात त्यानेच गळा आवळून तिचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरल्याचा अंदाज आहे. आपल्या मुलीचा तिच्या सासरच्यांनी सुपारी देऊन इरफानच्या हस्ते काटा काढल्याचा संशय तिच्या आईने व्यक्त केला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

जालना शहरातील जमुनानगरातील तरुणी मोनिका सुमित निर्मळ ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्मान रुग्णालयात आरोग्यसेविका म्हणून कार्यरत होती. ती पतीपासून विभक्त होती. माहेरी आईसोबत राहून ती रेल्वेने जालना येथून अपडाऊन करीत होती. ६ फेब्रुवारीरोजी ड्यूटीवर आल्यानंतर मोनिका घरी परत गेलीच. तिचा मोबाइलही लागत नव्हता, त्यामुळे आईने कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पोलीस अंमलदार नंदकुमार ठाकूर, दिलीप गायकवाड, शेख अन्सारी आदींनी शिल्लेगाव पोलिसांच्या मदतीने ही कामगिरी केली आहे.

'तो' म्हणाला मोनिकाची आत्महत्या!

पोलीस तपासात इरफान याने पोलिसांना वेगळाच जबाब दिला. त्यानुसार मोनिका ही ६ फेब्रुवारी रोजी रेल्वेने लासूर स्टेशन येथे आली होती. ते दोघे त्याच्या शेतातील पडीक घरात गेले होते. तेथे मोनिकाने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह त्याच ठिकाणी पुरल्याचे सांगितले होते. दरम्यान, कदीम जालना पोलिसांनी संभाजीनगर ग्रामीणच्या शिल्लेगाव पोलिसांची मदत घेत गंगापूरचे तहसीलदार यांच्या समक्ष मोनिकाचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर घटनास्थळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्याठिकाणी मोनिकाच्या अंगावरील कपडे जाळल्याचेही आढळून आले आहे. दरम्यान, इरफान याने मोनिकाने आत्महत्या केल्याचा केलेला बनाव खोटा असून, त्यानेच फाशी देऊन नंतर तिचा मृतदेह पुरून टाकला असावा, असा अंदाज आहे. पोलीस गुंतागुंतीच्या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास करत आहेत.

  त्याच्या मदतीनेच मुलीचा खून; आईची फिर्याद

दरम्यान, सदर प्रकरणात मोनिकाची आई सुनिता मार्कस झांबर यांनी शिल्लेगाव ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दाखल केली आहे. त्यातः मोनिकाच्या पतीसह सासू, सासरे यांनी आरोपी इरफान शेख याला सुपारी देऊन मुलीचा खून केला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी शिल्लेगाव ठाण्यात इरफान शेख सोबतच सुमित (पती) सपना निर्मळ (सासू) संजय निर्मळ (सासरा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोनिकाची आई सुनिता यांनी शिल्लेगाव ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मोनिका हिचा तिच्या सासरच्या मंडळींनी इरफान शेख याला सांगून खून केल्याचे म्हटले आहे. इरफान शेखने मुलीला फूस लावून लासूर स्टेशन येथील घरी नेले. तेथे त्याने अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह विवस्त्रावस्थेत पडक्या घरात पुरला. त्यांच्या तक्रारीवरून शिल्लेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनीही लासूर स्टेशन येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पडक्या घरात पुरलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढला. वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम कोनेरी यांनी जागेवर शवविच्छेदन केले.


तिच्या मोबाईलवरून  मॅसेज

दोन दिवसांनी मोनिकाच्या मोबाइलवरून तिच्या नातवाईकांना मी सुखरूप असून, मी लग्न केले आहे. आता मी तुम्हाला वर्षांनीच भेटायला येईल, अशा आशयाचा मेसेज आला. त्या मोबाइलवर कॉलबॅक केला असता फोन लागलाच नाही. त्यामुळे शंका आल्याने नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना भेटून तात्काळ तपासाची मागणी केली होती.


सीसीटीव्ही फुटेज ठरला पुरावा

जालना पोलिसांनी मोनिकाचा प्रियकर शेख इरफान शेख पाशा (रा. लासूर स्टेशन) यास ताब्यात घेऊन चार दिवसांपूर्वी चौकशी केली होती. मात्र, त्याने आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितल्याने त्याला सोडून दिले होते. तथापि त्याच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष होते. पोलिसांनी इरफानच्या मोबाइलच्या कॉल डिटेल्ससोबतच लासूर स्टेशन येथील काही सीसीटीव्ही फुटेज तपासले. मोनिकासोबतचे तासनतास केलेले मोबाइल संभाषण आणि ६ फेब्रुवारीला लासूर स्टेशन येथे फुटेजमध्ये मोनिका व इरफान दिसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यास गुरुवारी (दि. १३) पुन्हा ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच, त्याने अखेर तोंड उघडले.

 वाहनतळावरच जुळले प्रेमसंबंध

छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकापासून रुग्णालयात येण्या-जाण्यासाठी तिच्याकडे असलेली दुचाकी ती रेल्वे स्थानकावरील वाहनतळावर उभी करीत असे. दररोजच्या भेटीमुळे मोनिका आणि वाहनतळावर काम करणाऱ्या शेख इरफान (३५) हे चांगलेच परिचित होते. त्यातून ते एकमेकांशी बोलायचे. दररोजच्या भेटीमुळे या दोघांचे प्रेमसंबंध जुळल्याचा अंदाज आहे.

Post a Comment

0 Comments