व्हॅलेंटाईनदिनी उघडकीस आली घटना
लासूरस्टेशन : जादू बघण्यासाठी हात बांधून घेतले अन् जीव गमावून बसली. अगोदर सहवासाची सवय लावली. नंतर टाळाटाळ करू लागली. म्हणून लासूर स्टेशन येथील रहिवासी असलेल्या आरोपीने जालना येथील परिचारिकेचा दोरीने गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक माहिती पोलिसांना दिली. हत्या करायचा निश्चय केल्यानंतर आरोपीने १९ जानेवारीपासून खड्डा खोदायला सुरवात केली होती.
लासूर स्टेशन येथील दायगाव रस्त्यावर असलेल्या शवविच्छेदनगृहासमोरील शेतात तीस वर्षीय महिलेचा खून करून मृतदेह शेतात पुरल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी जालना येथील पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून शिल्लेगाव पोलिसांच्या मदतीने इरफान शेख याला अटक केली होती. त्यास २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
यादरम्यान पोलिसांनी हत्येप्रकरणात सर्व बाजूने तपास केला. यात पोलिसांनी घटनाक्रम, हत्येसाठी वापरलेले साहित्य, मयत महिलेच्या वस्तू मिळविल्या. आरोपी इरफान व मयत मोनिका हे दोघे दीड वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. गेल्या काही दिवसांपासून मोनिकाचा फोन सतत व्यस्त येत होता. त्यामुळे मोनिका अन्य कोणाच्या तरी संपर्कात आहे. अशी शंका इरफान याला आली. १८ जानेवारी रोजी दोघांत वाद झाला. १९ जानेवारी रोजी इरफान याने मोनिकाचा कायमचा काटा काढण्याचा निश्चय केला. तेव्हापासून त्याने त्याच्या शेतात असलेल्या एका पडक्या घरात खड्डा खोदायला सुरुवात केली होती.
असा रचला कट
६ फेब्रुवारी रोजी मोनिका छत्रपती संभाजीनगर येथून रेल्वेने दुपारी चार वाजता लासूर स्टेशन येथे आली. इरफानने तिला दुचाकीवरून बसून शेतात नेले. मोनिका प्रतिकार करील म्हणून आरोपीने तिला जादू दाखवतो. असे सांगत अगोदर हात बांधून नंतर डोळे बांधले. त्यानंतर दोरीने तिचा गळा आवळून खून केला.
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या अंगावरील कपडे काढून तिला खोदलेल्या खड्ड्यात पुरले व कपडे जाळून टाकले. आरोपीने मोनिकाच्या अंगावरील ४८ हजार रुपये किमतीचे दागिने लासूर स्टेशन येथील सराफा व्यापारी सुरेश वर्मा यांना विकले. चष्मा रेल्वेस्टेशन परिसरात फेकला तर बॅग नाल्यात टाकून दिली होती.
वैद्यकिय अहवाल ठरणार महत्त्वाचा
मयत मोनिका दोन वर्षांपासून पतीपासून विभक्त राहत होती. तर आरोपीचे तीन लग्न होऊनही मुल होत नसल्याने त्याच्यासोबत एकही पत्नी राहत नव्हती. मोनिकासोबत केवळ मैत्री होती. असे इरफानचे म्हणणे आहे. खून केला त्याअगोदर मोनिका सोबत बलात्कार झाला की नाही हे वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
0 Comments