वैजापूर पं. स. चा भोंगळ कारभार
अजब आणि गजब कारभारासाठी नेहमीच चर्चेत असलेल्या येथील पंचायत समिती कार्यालय (Vaijapur Panchayat Samiti) पुन्हा एकदा एका गलथान कारभारामुळे चर्चेत आले आहे. गायगोठ्या प्रशासकीय मंजुरी देत कार्यरंभ आदेश मिळालेल्या एका शेतकऱ्याचे नावच लाभार्थ्यांच्या यादीतून उडवून ( डिलीट ) पंचायत समितीने धमाल उडवून दिली आहे. दरम्यान शेतकऱ्याने आपली फसवणूक झाली म्हणून पोलिसांत धाव घेण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे संबंधित शेतकऱ्याने गायगोठा (Gaygotha) बांधण्यासाठी लाख रुपये किंमतीचे साहित्य ( Material ) आणून ठेवले आहे. अशा परिस्थितीत त्याला धाप मोकळून रडण्याची वेळ आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तोपंत विठ्ठल रंधे यांची तालुक्यातील खंबाळा शेत गट क्रमांक ३ मध्ये शेतजमीन आहे. त्यांनी सन २०२३-२४ मध्ये त्यांना गायगोठा मंजूर झाला होता. दरम्यान महराष्ट्र रोजगार ग्रामीण योजनेतंर्गत गायगोठा मंजूर झाला होता. या कामापोटी त्यांची हजेरीपुस्तिका (मस्टर) चालू करण्यात आली होती. ही हजेरी पुस्तिका ऑनलाईन देखील करण्यात आली.
यामुळे शेतकरी दतोपंत रंधे यांनी गायगोठ्याचे काम सुरू करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य देखील खरेदी केले. यानंतर कुशल देयक काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समितीस भेट दिली. मात्र तिथे त्यांना त्यांचे नाव यादीतून वगळण्यात (डिलीट) आल्याचे समजले. यामुळे दत्तोपंत यांना धक्काच बसला. मग कुणीतरी त्यांना ग्रामपंचायतीला संपर्क करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी खंबाळा/कीरतपूर (ग्रुप ग्रामपंचायत) ग्रामपंचायतीला भेट दिली. तिथे त्यांनी गायगोठ्याचे मंजुरी पत्र व कार्यारंभ आदेश सादर केला. हे बघून ग्रामपंचायतीतील संबंधित सुद्धा गोधळात पडले.
अखेर ग्रामपंचायतीने वैजापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना (Block Development officer) लेखी पत्र देऊन झालेल्या गोंधळाबाबत कथन करून शेतकऱ्याचे ऑनलाइन डिलीट झालेले नाव पुन्हा ऑनलाईन करावे. अशी विनंती केली. परंतु एवढ्यावरच मानणार ते वैजापूर पंचायत समिती कशी ? ग्रामपंचायतीचे हे पत्र आवक-जावकला जमा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनंतरच यात काही तरी तोडगा निघेल असे शेतकऱ्याला सांगून शेतकऱ्याला पिटाळून लावण्यात आले. तत्पूर्वी शेतकऱ्याने रोजगारसेवक, अभियंता व जिओ टॅगिंगसाठी (jio Tagging ) प्रत्येकी 'अर्थपूर्ण' उठापटक केली. परंतु एवढे करूनही शेतकऱ्याच्या हाती भोपळाच आल्याने पंचायत समितीत हेलपाटे मारण्यापलीकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नाही.
अखेर या सर्व प्रकरणी आपण पोलिसांत धाव घेणार असल्याचे शेतकऱ्यांने म्हटले आहे. गायगोठ्यासाठी प्रशासकीय मान्यतेसह कार्यारंभ आदेश मिळाले. हजेरीपुस्तिकाही सुरू झाली. मग अचानक नाव वगळले कसे? याला जबाबदार कोण? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु काही असले तरी या कटकारस्थानामागे यंत्रणेतीलच कुणी जबाबदार आहे? हे मात्र नक्की! याचाच अर्थ पंचायत समितीत किती गलथान कारभार सुरू आहे. याची प्रचिती येते.
संबंधित शेतकऱ्याचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. त्यांचे नाव कुणी का व कशासाठी वगळले? हे आज सांगता येणार नाही. हे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आले आहे. या कार्यालयाकडून काय अभिप्राय येतो? त्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल.
- आनंद मगर, मग्रारोहयो विभाग, पं.स. वैजापूर
0 Comments