वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा
गोवंश जातीच्या जनावरांची मांस परस्पर विल्हेवाट लावून त्यांची हाडे, शिंग, सापळे, कवट्या वाहनातून घेऊन जाणाऱ्या एकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याकूब साबेर कुरेशी (रा.येवला रोड, वैजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शहरालगत असलेल्या खंडोबा नगर परिसरात एका वाहनात (क्रमांक एम.एच.४३ बी.जी.२६५८) गोमांस वाहतूक होत असून हे वाहन नागरिकांनी अडवून ठेवल्याची माहिती वैजापूर पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाव घेऊन वाहन चालकाची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने त्याचे नाव याकूब कुरेशी असल्याचे सांगितले. लगेचच पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनात जनावरांची शिंगे, हाडांचा सापळा, पायांची हाडे व कवट्या आढळून आल्या.
याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात याकूब कुरेशी याच्याविरुद्ध विनापरवाना जनावरांची हत्या करून मांसाची परस्पर विल्हेवाट लावून वाहतूक करताना मिळून आल्याने महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments