Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Chhaava Movie | छावा: छत्रपती संभाजीराजेंची शौर्यगाथा; इतिहास.. उत्कटता.. देशभक्ती अन् भावनांचा उत्कृष्ट संगम!

अप्रतिम कलाकृती 


इतिहास, भावना, उत्कटता, देशभक्ती, अँक्शन यांचा सुरेख संगम साधत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Director Lakshman Utekar) यांनी 'छावा' ही अप्रतिम अशी कलाकृती सादर केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची ( Chhatrapati Sambhaji Maharaj) ज्या क्रूर पद्धतीने औरंगजेबाने हत्या केली तो दुर्दैवी प्रसंग पाहताना अक्षरशः काळजावर दगड ठेवावा लागतो. छत्रपती संभाजी महाराजांना दिलेली प्रत्येक वेदना यात दाखवलेली आहे. या वेदनेसह आपल्याला भलं मोठं दुःख घेऊन चित्रपट गृहाबाहेर पडावे लागते.

प्रसिद्ध साहित्यिक 'छावा'कार शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. या सिनेमामुळे हा पराक्रमी छावा आता जगभर जाऊन नव्या पिढीला लढण्याची प्रेरणा देईल. हे नक्की. 


चित्रपटात पुढे काय होणार? हा इतिहास माहित असला तरी हा चित्रपट तुम्हाला पहिल्या दृश्यापासून ते शेवटपर्यंत बांधून ठेवतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेला विकी कौशल (Vicky kaushal) याने संपूर्ण न्याय दिला आहे. किंबहुना त्याहून अधिक चांगली भूमिका दुसरा कोणी साकारू शकणार नाही इथपर्यंत त्याने या भूमिकेत जीव ओतला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे शूरत्व, राज्य कारभार करताना समोर जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेली शिकवण, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्यातील स्वराज्य विषयीचे भावनिक क्षण, स्त्री, सखी, राज्ञी, या संकल्पनेला पुरेपूर उतरलेली आणि येसूबाईच्या भूमिकेत असलेली रश्मीका मंदाना ( Rashmika Mandana ) हिने या ऐतिहासिक कथेला आपल्या अभिनयाने भावनिक खोली आणि उंची मिळवून दिली. 

चित्रपटात भव्य दृश्ये आहेत, ज्यात रणांगणे आणि राजवाडे भव्यतेने साकारलेली आहेत. लढाईच्या देखाव्यांना सुसज्जतेने पडद्यावर आणले आहे. ही दृश्ये पाहताना अंगावर रोमांच उभा राहतो. छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर लुटल्यांनतर औरंगजेब (Aurangzeb)   आपल्या मुकुटावरील ताज जेंव्हा खाली ठेवतो तो प्रसंग जबरदस्त, अप्रतिम चित्रित करण्यात आला आहे. 


 औरंगजेबाच्या भूमिकेत असलेला अक्षय खन्ना (Akshay Khanna ) याने त्याच्या भूमिकेला संपूर्ण न्याय दिला आहे. औरंगजेबचे मौन अतिशय क्रूर पद्धतीने त्याने साकारलेले आहे. अक्षयखन्ना उत्कृष्ट अभिनेता असल्याचे यावरून लक्षात येते. चित्रपटात हंबीरमामा, सोयरा मातोश्री, औरंगजेबची मुलगी, कवी कलश आदींच्या भूमिका साकारणारे कलाकार देखील आपल्या अभिनयाची छाप सोडून जातात. 
ए.आर.रहमान यांचे संगीत कथेस पूरक आहे. लढाईची दृश्ये पार्श्वसंगीतामुळे अधिकच प्रभावी झाली आहेत. परंतु चित्रपटात एकतरी अविस्मरणीय गाणे असायला हवे होते. जेणेकरून चित्रपट संपल्यानंतर ते गाणे गुणगुणता आले असते. निदान त्यामुळे तरी दुःखद शेवट विसरता आला असता. एकंदरीतच दिग्दर्शकाने भव्यदिव्य 'छावा' उभा करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यामुळे वेळ खर्ची घालून हा चित्रपट एकदा बघायलाच हवा.




Post a Comment

0 Comments