अस्तित्वासाठी सुरू आहे 'खटाटोप'
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील भाजप नेत्यांची पुन्हा घरवापसी सुरू झाली आहे. या निवडणुकीत बंडखोरी करूनही आमदारकीचे स्वप्न भंगल्याने त्यांच्याकडे घरवापसी करण्यासाठी पर्याय उरला नाही. राजकीय 'दुकानदारी' सुरू ठेवण्यासाठी नेत्यांना राजकीय पक्षाची गरज आहे. त्यामुळेच 'झालं गेलं, गंगेला मिळालं' हे ब्रीद समोर ठेवून पुन्हा नव्याने वाटचाल सुरू केली आहे. परंतु असे असले तरी राजकीय 'पुनर्वसन' होईलच. याची शाश्वती नाही. पुनर्वसन झाले नाही तरी चालेल. परंतु राजकीय 'बॅनर' आवश्यक आहे. हिच मेख ओळखून नेत्यांनी पटापट प्रवेश उरकून टाकण्याचा सपाटा सुरू केला आहे.
छत्रपती संभाजीनगरात सिल्लोडचे सुरेश बनकर व वैजापूरचे एकनाथ जाधव या भाजपच्या दोन्हीही माजी जिल्हाध्यक्षांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavnkule) व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Ravsaheb Danve ) यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रवेश करून घरवापसी केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत बनकरांनी ठाकरेसेनेत जाऊन तर एकनाथ जाधवांनी बंडखोरी करीत विधानसभा निवडणूक लढविली. दोघेही या निवडणुकीत पराभूत झाले.
पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे भाजप बंडखोरांची पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची घोषणा त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी करून तात्पुरते उठलेले वादळ शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे केवळ 'पेल्यातील वादळ' ठरले. असं आता म्हणता येईल. विधानसभा निवडणूक होऊन अजून पुरते तीन महिनेही पूर्ण झाले नाही. तोच बंडखोर पुन्हा प्रवेश घेऊन दुटप्पीपणाची भूमिका घेत आहेत. याला जबाबदार पक्षप्रमुख आहेत की, बंडखोर नेते? हा संशोधनाचा विषय असला तरी सर्वच 'थड्यांवर' हात ठेवून राजकीय मार्गक्रमण करणाऱ्या नेत्यांना काय म्हणावे? हाच खरा प्रश्न आहे.
एकीकडे मी पक्षनिष्ठा ठेवून आहेत. पक्षाला तिलांजली देणार नाही. असं घसा ताणून वारंवार सांगणाऱ्या नेत्यांचे हे वेगवेगळे 'अवतार' पाहून सामान्य नागरिकांना मोठमोठे 'झटके' बसत आहे. भाजप महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे (MLA Ramesh Bornare) यांच्या विरुद्ध एकनाथ जाधवांनी बंडखोरी करूनही विधानसभा निवडणुकीच्या भाषणात 'मी अजून भाजपमध्ये आहे'. असं वारंवार सांगत होते. पक्षाने त्यांना निलंबित केल्याची अधिकृत घोषणा करूनही ते त्यांचा 'व्होरा' सोडत नव्हते. त्यामुळे जाधवांची ही एकनिष्ठता समजायची की पक्षाची? हे काहीच कळायला मार्ग नाही.
पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे पक्ष नाराज, दुसरीकडे उमेदवारी मिळाली नाही म्हणून नेते नाराज! नेत्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा स्वस्थ बसू देत नाही अन् पक्षाला युतीधर्म पाळावा लागतो. या दोन्हीही गोष्टी बरोबर असल्या तरी आजकाल नीती मूल्य कशाशी खातात? याचं भान कुणालाच राहिलेलं नाही. पक्ष तोंडदेखल्यापणाची कारवाई करतो. नेते पुन्हा विसरून पक्षाच्या वळचणीला येतात. हा फंडा गेल्या काही वर्षांपासून राज्यातील जनता अनुभवते आहे. पक्षाशी खरंच निष्ठा असेल तर नेत्यांनी पक्ष सोडू नये आणि कारवाई केली तरी पक्षानेही अवघ्या काही दिवसांतच घरवापसी करून प्रवेशसोहळे उरकू नयेत. हा सामान्यांचा विचार आहे.
जाधवांसारख्या जुन्या नेत्याला अनेक वर्षात पक्षात राहून विधानसभा निवडणुकीत दहा हजार अ़ंकाची फिगर गाठता आली नाही. 'अर्थ'शास्त्राच्या जोरावर ते तरूण जातील. असं त्यांना वाटत असतानाच आठ हजारांपलिकडे त्यांना मजल मारता आली नाही. यापेक्षाही दारुण अवस्था त्यांच्या थोरल्या बंधूची झाली. त्यांनीही 'लक्ष्मी'प्रसाद वाटून कोटींची उड्डाणे घेतली. परंतु दोन हजारांच्या आत राहवे लागले. ज्या - त्या राजकीय परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. हे कितीही खरं असलं तरी आजकाल उदयास येऊ पाहत असलेली अराजकता दोन्हींसाठी मारकच आहे. गेल्या तीन वर्षांत राज्याने मोठमोठी राजकीय स्थित्यंतरे अनुभवली. त्या तुलनेत या बाबी नगण्य आहेत. असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. परंतु समर्थनीय आहे. असं नक्कीच नाही.
हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरी राजकारण अथवा समाजकारणात तो वैयक्तिक राहिलच. असं नाही. जेव्हा एखाद्याचा या प्रांतात प्रवेश होतो. तेव्हा त्याला सार्वजनिकतेचे 'लेबल' लागते. एखाद्या नेता पक्ष सोडतो किंवा प्रवेश करतो. तेव्हा त्याच्यामागे समाजाचा, कार्यकर्त्यांचा मोठा जत्था असतो. तो एकटा असतोच. असं नाही. परंतु हे नेत्याच्या योग्यतेवर अवलंबून असतं. सर्वांच्याच बाबतीत हे लागू आहे. असंही नाही. नेते येतील - जातील, पक्ष प्रवेश करून घेईल वा काढून टाकील. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यापुढेही चालूच राहिलं. परंतु पक्षनिष्ठा, नीतीमूल्य, निष्ठावंत हे शब्द केवळ पुस्तकांपुयरतेच मर्यादित राहिले. असं खेदाने म्हणावे लागते.
0 Comments