Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

BJP Entry | 'मविआ' झाली 'पोरकी'; डॉ. परदेशी स्वगृही: उबाठा, काॅंग्रेस नेते गळाला!

आगामी निवडणुकीत मोठे आव्हान!


 
वैजापूर विधानसभा निवडणूक (Vaijapur Assembly Election) झाली अन् पक्ष सोडून गेलेल्यांची पुन्हा भाजपत (Bjp) घरवापसी सुरू झाली. घरवापसीत प्रमुख पदाधिकाऱ्यांचा ओघच सुरू झाला. गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या राजकारणात हे चित्र बघावयास मिळत आहे. परंतु माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी (Dr Dinesh Pardeshi)यांनी घरवापसी करतांना केवळ ठाकरेसेनेलाच खिंडार पाडले नाही अख्ख्या महाविकास आघाडीलाच भगदाड पाडले. महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील जवळपास सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हाती 'कमळ' घेऊन भाजपवासी झाले. परिणामी आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान असणार आहे.

 


विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी पक्ष सोडून अन्य पक्षात जाऊन पळपळ करणाऱ्यांच्या वाट्याला 'स्वप्नभंग' आल्याने जिल्ह्यात पुन्हा भाजपकडे ओघ वाढला आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव (Eknath Jadhav) यांनी छत्रपती संभाजीनगरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavnkule) यांच्या प्रमुख उपस्थितीत गाजावाजा न करता प्रवेशसोहळा उरकून घेतला.

 काही दिवसांनंतर तोच कित्ता डॉ. दिनेश परदेशी यांनी गिरविला. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी ठाकरेसेनेत प्रवेश घेऊन विधानसभा लढविली. या निवडणुकीत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. निवडणुकीनंतर डॉ. परदेशींना पुन्हा भाजपमध्ये जाण्याचे वेध लागले. विधानसभा निवडणुकीत ठाकरेसेनेचा (UBT) झालेला 'खुर्दा' व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता या पक्षात राहून फारसं 'चांगभलं' होईल. असा ठाम आत्मविश्वास नसल्यामुळे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निश्चय करण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राजकारणात ( Politics ) केव्हा काहीही होऊ शकते. हे आता वेगळं सांगायची गरज नाही. 

संचेती, गलांडे गळाला!

डॉ. परदेशींची घरवापसी झाली. परंतु त्यांनी काॅंग्रेसचे एकमेव 'उरलेले' खंदे नेते बाळासाहेब संचेती, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) तालुकाध्यक्ष मंजाहरी गाढे, ठाकरेसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये नेऊन महाविकास आघाडीलाच भगदाड पाडले. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना तालुक्यात प्रमुख पदाधिकारीच उरले नाही. पक्ष बळकटीसाठी वरिष्ठांना अगोदर प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यानंतर पक्षवाढीसाठी हालचाली होतील. 

चिकटगावकरांना सोडावा लागला 'उबाठा'

डॉ. परदेशींमुळे मोठा 'गच्छा' झाला ही बाब मान्यच करावा लागेल. भाजप सोडल्यामुळे स्थानिक पातळीवर पक्ष 'पोरका' होऊन ठाकरेसेनेला बळकटी मिळाली. तत्पूर्वी ते पक्षात जाणार म्हणून माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांनी ( Former MLA Bhausaheb Patil Chikatgaonkar ) ठाकरेसेना सोडली. आता डॉ. परदेशींनी पुन्हा ठाकरेसेना सोडून भाजपचे 'कमळ' हाती घेतले. परिणामी ठाकरेसेना पुन्हा 'उघड्या'वर पडली. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चिकटगावकरांनी जेव्हा ठाकरेसेना सोडली तेव्हा मोजके पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. परंतु डॉ. परदेशींनी जवळपास सर्वच ठाकरेसेना 'साफ' केली. असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. 

तुझ्या गळा.. माझ्या गळा!

परिणामी ठाकरेसेनेत 'सक्षम' नेतृत्वच उरले नाही. ज्या सक्षमतेच्या मुद्द्यावरून चिकटगावकर बाजूला झाले ते पुन्हा ठाकरेसेनेत गेले तर अपूर्वाई वाटण्याचे कारण नाही. राज्यात भाजप, शिवसेना व (NCP Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) सरकार आहे. दुसरीकडे शिंदेसेनेचे रमेश बोरनारे (Shivsena MLA Ramesh Bornare) सत्तापक्षातील आमदार आहेत. डॉ . परदेशींचा भाजप प्रवेश पाहता पुन्हा एकदा आमदार बोरनारे व डॉ. परदेशींना 'तुझ्या गळा..माझ्या गळा..गुंफू सत्तेच्या माळा' या काव्यपंक्तीनुसार राजकारण करावे लागणार आहे.

यथेच्छ तोंडसुख 

 विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर 'यथेच्छ' तोंडसुख घेतले होते. त्यांनाही आता लाजत - लाजत का होईना. पुन्हा एकत्र येऊन मांडीला - मांडी लावून बसण्याची नामुष्की ओढवली आहे. एकंदरीतच राजकारणात काहीच स्थिर नाही अन् राजकारण करणारे नेतेही अस्थिर आहे. हे मात्र तितकेच खरे आहे!

Post a Comment

0 Comments