पाचजण गंभीर जखमी, मृतांत रुग्णाचा समावेश
भरधाव जाणारी रुग्णवाहिका अज्ञात वाहनाला पाठीमागून धडकून दोघेजण जागीच ठार तर अन्य पाचजण गंभीर जखमी झाल्याची घटना समृद्धी महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील हड्सपिंपळगाव शिवारात ५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान ज्या रुग्णवाहिकेतून रुग्णाला घेऊन जात होते. तो रुग्णही या अपघातात ठार झाला. रुग्णवाहिकेच्या चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची बाब समोर आली आहे.
समीर मोहम्मद वय (५७ ) व अमिना खातून मोहम्मद (५२ ) रा. बिहार अशी अपघातातील मृतांची नावे आहे तर प्रकाश विक्रम पाटील (४५ रा. नाशिक), मोहम्मद इम्तियाज (४० रा. बिहार), गुलाबसा खातुन (२० रा. बिहार) ,सचिन रामदास खरे (४२ रा. नाशिक), हासिब समीर मोहम्मद (३७ रा. बिहार) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.
हेही वाचा: Court Order| दारू पाजून खून! 'त्या' दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करा
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार समीर मोहम्मद या रुग्णाला त्यांचे नातेवाईक रुग्णवाहिकेतून (क्रमांक एम.एच. १५ ई.एफ. ००८९) नाशिक येथून बिहार राज्यातील पाटणा येथील एम्स रुग्णालयात घेऊन जात असताना बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील हड्सपिंपळगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या पाठीमागून रुग्णवाहिका धडकली.
हेही वाचा: 'ते' दोघे विद्युतपंप घेऊन जात होते; कारने धडक दिली अन् सर्वच संपलं!
अपघातानंतर रुग्णवाहिकेतील सर्वांनाच महामार्ग पोलिस कर्मचारी सचिन पाटील, शेख, शिवाजी बेळे, किरण लोहार, दिनेश कोल्हे, वैजापूर पोलिस ठाण्याचे किरण गोरे,भोजने, जटाळे यांनी तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समीर मोहम्मद व अमिना खातून या दोघांना तपासून मृत घोषित केले तर अन्य जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मृत समीर मोहम्मद यांचा मुलगा हासिब समीर मोहम्मद याने दिलेल्या फिर्यादीवरून रुग्णवाहिका चालक किरण हरिश्चंद्र साळुंखे (रा. अंबड , नाशिक) याच्याविरुद्ध वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'ते' वाहन झाले फरार !
भरधाव जाणारी रुग्णवाहिका पाठिमागून धडकल्यानंतर समोरचे वाहन काही क्षणातच निघून गेले. त्यामुळे हे वाहन कोणते होते. याचा पोलिसांना थांगपत्ता लागला नाही.
0 Comments