येथेच बहरल्या साहीत्यकृती
सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्राचार्य रा. रं. बोराडे मंगळवारी निवर्तले. त्यांच्या निधनानंतर वैजापूरकरांच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. जवळपास दोन दशकं वैजापूरच्या मातीशी त्यांची नाळ जोडलेली होती. प्राचार्य म्हणून त्यांनी केलेली कामे आजही वैजापूकरांच्या स्मरणात कायम आहे.
ग्रामीण साहित्यिक तथा प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या हातून अनेक साहित्यकृती निर्माण झाल्या तशा अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्याही घडल्या. नोकरीतील त्यांची २० वर्षें येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात प्राचार्य पदावर गेली. सन १९७१ ते १९९१ पर्यंत ते प्राचार्य पदावर कार्यरत होते. विनायकराव पाटील महाविद्यालयास सन १९६८ साली मंजुरी मिळाल्यानंतर सुरवातीला शहरातील येवला रस्त्यावरील सध्या भाजी मंडई भरत असलेल्या इमारतीत महाविद्यालय सुरू करण्यात आले. साधारणतः १९७५ नंतर सध्यस्थित असलेल्या इमारतीत सर्व विभाग हळूहळू जाण्यास सुरुवात झाली. तत्पूर्वी सन १९७१ मध्ये मराठी विषयाबरोरबरच बोराडे यांनी प्राचार्य पदाची धुरा सांभाळली. तब्बल दोन दशकं त्यांनी ही धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्या कार्यकाळातच महाविद्यालय नावारूपाला आले. याच बरोबर त्यांच्यातील साहित्यिकही बहरत, फुलत गेला. त्यांच्या हातून 'पाचोळा'सारखी कांदबरी साहित्यकृती निर्माण झाली अन् पाहता पाहता राज्य शासनाकडून या कांदबरीला पुरस्कारही बहाल केला गेला. त्यांचे केवळ कांदबरी सारख्या लिखाणावरच प्रभुत्व नव्हते तर नाटकं, कथासंग्रह आदी साहित्य प्रांतातही त्यांची 'मुशाफिरी' होती. त्यांचे जवळपास ४० पुस्तके प्रकाशित झाली होती. राज्य शासनाने त्यांना अनेक विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांच्या ग्रामीण साहित्यातील अस्सल ग्रामीण 'बाज' वाचकांना भावून गेला. लिखाणाचा बाज आणि खोली हे त्यांच्या साहित्यांचे खास वैशिष्ट्ये राहिले. ग्रामीण वाचक आणि शेतकरी वर्ग समोर ठेवून लिहिणाऱ्या बोराडेंनी या क्षेत्रात आपला आगळावेगळा 'ठसा' उमटविला. सन १९९१ मध्ये त्यांची येथून बदली झाली. सेवानिवृत्तीनंतर राज्य शासनाच्या साहित्य सांस्कृतिक मंडळाचे ते तब्बल तीन वर्षे अध्यक्ष होते. लातूर जिल्ह्यातील काठगावसारख्या गावखेड्यातून आलेल्या बोराडेंना गमावल्याने साहित्याच्या प्रांतात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना नवलेखकांसह साहित्यिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
'तांडा चालला'चे चित्रीकरण वैजापुरात
एकेकाळी दूरदर्शनवर सुरू असलेली 'तांडा चालला' ही मालिका बोराडे यांच्याच कथा - कल्पनेवर आधारित होती. या मालिकेचे चित्रीकरणही तालुक्यातील लाडगावसह गंगथडी भागात झाले होते. मुंबईतील कलाकारांनी त्याकाळी गावखेड्यात येऊन येथे चित्रीकरण सुरू केल्याने हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.
रा. रं. बोराडे जेव्हा सुरवातीला वैजापूर येथे रुजू झाले. तेव्हा मी त्यांचा तीन वर्षं विद्यार्थी होतो. या काळात ते आम्हाला मराठी विषय शिकवित होते. सन १९७५ साली मी जेव्हा प्राध्यापक म्हणून रुजू झालो. त्यानंतर मी त्यांच्या हाताखाली अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. प्राचार्य म्हणून ते चांगलेच होते. परंतु साहित्यिक म्हणून ते नेहमीच ग्रेट होते.
- भीमराव वाघचौरे, सेवानिवृत्त प्राध्यापक, वैजापूर
0 Comments