भरारी पथकाकडून भांडाफोड
नकलामुक्त परीक्षेसाठी (Copy free exam ) शासनस्तरावरून कसोशीने प्रयत्न होत असताना दुसरीकडे शिक्षण संस्थाचालकांसह शाळेतील गुरुजी व अन्य कर्मचारीच नकलांसाठी पाठबळ देऊन हरताळ फासल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयात (kalptaru junior college Nimgaon) इयत्ता बारावीच्या जीवशास्त्राच्या परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर नकलांचा हिडीस प्रकार उघडकीस आला. शिक्षण विभागाच्या (Education Department) भरारी पथकाने (Bharari squad) अचानक भेट देताच इमारतीच्या आजूबाजूला गाईड, मायक्रो झेरॉक्स, नवनीत आणि अन्य कॉपीचे साहित्य आढळून आले. याप्रकरणी संस्थेच्या अध्यक्षासह सचिव व प्राचार्य अशा एकूण १७ जणांविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात (Shiur police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा मंडळाकडून नकलांना आळा घालण्यासाठी विविध पथके तैनात केली आहे. तालुक्यातील निमगाव येथील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयात भरारी पथकाने केंद्रात प्रवेश करताच परीक्षार्थींनी उत्तरपत्रिकांसह कॉपी साहित्य दालनाबाहेर फेकण्याचा प्रयत्न केला.
संस्था अध्यक्ष, सचिव, केंद्र संचालक व अन्य १५ पर्यवेक्षकांनी परीक्षा प्रक्रियेत गंभीर दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही बाब गंभीर मानून जिल्हाधिकारी (Collector), मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Excutive officer) आणि विभागीय शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार वैजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी (BEO) हेमंत उशीर यांना संबधितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले.
तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून अहवालानंतर संस्था आणि केंद्र संचालकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात एका विद्यार्थ्यालाही कॉपी केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले असून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या या कठोर कारवाईमुळे संपूर्ण जिल्हयात खळबळ उडाली आहे.
'या' महाविद्यालयांवर कधी जाणार नजर?
दरम्यान इयत्ता बारावीच्या परीक्षेत तालुक्यातील बहुतांश महाविद्यालयात नकलांचा सुळसुळाट सुरू आहे. नकलांची रसद पुरविण्यासाठी संस्थाचालकांसह शिक्षकांनी पुढाकार घेतलेला असल्याचे दिसून येते. याशिवाय मुंबई, पुणे व राज्यातील अनेक जिल्ह्यातील परीक्षार्थी या केंद्रांवर बसवून त्यांचे उक्ते 'टेंडर' घेतले असल्याचीही माहिती समोर आली आहे. शहरालगतच्या आघूर येथील एका महाविद्यालयासह तालुक्यातील नालेगाव येथील परीक्षा केंद्रावर नकलांची अक्षरशः धूम सुरू आहे. या महाविद्यालयांवर पथकाची नजर कधी जाणार? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी प्राचार्य अजिनाथ काळे, संस्था अध्यक्ष जी. एस. पवार, सचिव वैशाली पवार, पर्यवेक्षक व्ही.एस. काटे, सी.यू. जाधव, एस.बी.गुंजाळ, के.के. घाटवळे, एच.बी. खंडीझोड, जे.डी. कुंदे, आर.बी. जाधव, व्ही.जी. पवार, जी. एस. डरले, ए. एस. निकम, आर.व्ही. कुन्दड, के.एस. सोनवणे, आर.बी. नराडे, एस.एस. आहेर या १७ जणांविरुद्ध कर्तव्यात कसूर करुन महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ आणि इतर विशिष्ट गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
0 Comments