निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लावणार
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief minister Eknath Shinde)यांच्या हस्ते येथील उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन सेवेचे दृक प्रणालीद्वारे (ऑनलाईन) रविवारी (ता.०९) रोजी लोकार्पण करण्यात आले. दरम्यान आमदार प्रा. रमेश बोरनारे (MLA Ramesh Bornare) यांच्याहस्ते सीटी स्कॅन यंत्राची फीत कापून औपचारिक लोकार्पण करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी (Dr. Dinesh Pardeshi). आरोग्य सेवा परिमंडळाच्या उपसंचालिका डॉ. कांचन वानेरे (Dr. Kanchan Wanere), वैद्यकीय अधीक्षक बी.एन. मोरे, डॉ. सुधाकर मुंढे, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, माजी उपनगराध्यक्ष साबेरखान, डॉ . सुभाष भोपळे, डॉ. राजीव डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते व आरोग्यमंत्री प्रकाश अभिटकर यांच्या ऑनलाईन उपस्थितीत ठाणे येथे झालेल्या राज्यातील वैजापूर व गोंदिया या दोन ठिकाणी सी. टी. स्कॅन सेवेचा तर राज्यातील ८ परिमंडळात ८ कर्करोग व्हॅन, ३८७ रुग्णवाहिका (डायल १०२), डिजिटल हॅंड हेल्ड मशीन व इतर सुविधांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी आमदार रमेश बोरनारे यांनी भाषणात बोलताना सांगितले की, दोन आठवड्यांपूर्वी मी उपजिल्हा रुग्णालयात आढावा बैठक घेतली होती. या ठिकाणी कमतरता असलेल्या संसाधनांची वैद्यकीय अधीक्षकांकडे चौकशी केली होती. मी सी टी स्कॅन सेवा सुरू करण्यासाठी सतत पाठपुरावा केला. याशिवाय प्रति नियुक्तीवर असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांऐवजी कायम स्वरूपी अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करीत आहे तर सी टी स्कॅन यंत्र उपलब्ध झाल्याने १०० खाटांच्या वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातील ट्राॅमा केअर सेंटरला पूर्णत्वाचे स्वरूप आल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानासाठी इमारत उभी करण्यासाठी आपण पत्रव्यवहार करत असल्याचे देखील आ. बोरनारे यांनी याप्रसंगी सांगितले.
जिल्हा बँकेचे संचालक डॉ दिनेश परदेशी यांनीही यावेळी भाषणातून रुग्णालयात उपलब्ध करून दिलेल्या सुविधांसाठी राज्य सरकारचे आभार मानले. या कार्यक्रमास शहरप्रमुख राजेंद्र साळुंके. संचालक गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन, कल्याण जगताप, अमीर अली, डॉ. प्रशांत बडे, डॉ. रिझवान शेख, क्रिस्ना डायग्नोस्टिक सेंटरच्या टीमसह रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
प्रसूतीच्या अडचणींवर करणार मात!
दरम्यान आरोग्य सेवा परिमंडळाच्या उपसंचालक कांचन वानेरे यांनी त्यांच्या भाषणात बोलताना कोव्हिड काळात संपूर्ण राज्यात आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेला शतः प्रतिशत सेवा देण्याचा प्रयत्न केला. असे सांगितले. याशिवाय यापुढील काळात देखील परिमंडळात आम्ही जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी बांधील आहोत. मात्र वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात महिला रुग्णाच्या प्रसूती दरम्यान येणाऱ्या अडचणींवर लवकरच आम्ही मात करून प्रसूती रुग्णांना पूर्णतः येथील उपजिल्हा रुग्णालयातच आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
0 Comments