Onion Scam | संतापजनक: सभापती वाढदिवसात अन् शेतकरी उपोषणात! व्यापाऱ्याने गंडविल्याचे प्रकरण

0

 बाजार समितीच्या आवारात 'उपोषणास्त्र'

वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. काही शेतकऱ्यांची प्रकृती खालावल्याने डाॅक्टरांना बोलाविण्यात आले होते.


 अडत व्यापाऱ्याने तब्बल ४०० शेतकऱ्यांना ठगवून दोन कोटी रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण तीन महिन्यांपासून गाजत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने पैसे देण्याची डेडलाईनही संपली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात बसून उपोषणास्त्र उपसले आहे. शेतकरी उपोषणात असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती मात्र वाढदिवस साजरा करण्यात मग्न आहेत. असा आरोप उपोषणार्थी शेतकरी करीत आहेत.


हेही वाचा: शेतकऱ्यांना 'तारीख पे तारीख'; दोन कोटींच्या कांद्याचे प्रकरण


वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात  दोन कोटी रुपयांचा कांदा विक्री करणाऱ्या ४०० शेतकऱ्यांना पैसे न देताच व्यापाऱ्याने धूम ठोकल्याचे प्रकरण तीन महिन्यांपूर्वी घडले होते. दरम्यान या प्रकरणानंतर बाजार समितीने शेतकऱ्यांना १० जानेवारीपर्यंत पैसे देण्याची हमी दिली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी बाजार समितीच्या कार्यालयात चकरा मारीत असताना त्यांना कोलून लावले जात आहे. शेतकरी या कार्यालयात गेले असता कर्मचारी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते नाॅट रिचेबल असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यापुढचा कहर म्हणजे बाजार समितीने काही शेतकऱ्यांना धनादेश दिले. त्या धनादेशावर स्वाक्षरीच नसल्याचे समोर आले आहे. व्यापाऱ्याने तर शेतकऱ्यांची फसवणूक केलीच. परंतु बाजार समितीनेही धनादेशावर स्वाक्षरी न करता शेतकऱ्यांना ठगविले. 


हेही वाचा: अन् 'त्याने' पोलिस ठाण्यातच घेतले विष; तहसीलदारांनी वाळूचे वाहन पकडणं लागले जिव्हारी


दोन दिवसांपासून बाजार समितीच्या आवारात 'राडा' सुरू आहे. परंतु त्यांची कुणी दखल घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांनी त्यांच्या जबाबदारीवर व्यापाऱ्याला कांदा दिला. त्यामुळे बाजार समिती यासाठी जबाबदार कशी असेल? असाही एक मतप्रवाह पुढे येत आहे. त्यामुळे यात चूक शेतकऱ्यांची की बाजार समितीची? हा गहन व संशोधनाचा विषय बनला आहे. परंतु असे असले तरी १० जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे देण्याची हमी बाजार समितीने दिली होती. त्यामुळे या बाबीला बाजार समिती जबाबदार नाही तर मग शेतकऱ्यांना रक्कम देण्याची हमी दिलीच कशी? हेही न उलगडलेले कोडेच म्हणावे लागेल.


हेही वाचा: 'तिचा' बळी गेल्यानंतर पालिकेला 'जाग'; झाडांची केली छाटणी


 बाजार समितीकडून शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी आता आवारातच उपोषण सुरू केले आहे. एकीकडे बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे बाजार समितीचे सभापती मात्र वाढदिवस साजरा करण्यात मग्न असल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सभापतींना वाढदिवस महत्त्वाचा आहे की उपोषणार्थी शेतकऱ्यांची रक्कम? हेच आम्हाला कळेनासे झाले असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा एका शेतकऱ्याची तब्येत खालावल्याने त्याला शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा सर्व प्रकार सुरू असताना देखील बाजार समिती प्रशासनाला अद्याप जाग न आल्याने दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे उपोषण सुरू होते. बाजार समितीच्या काही कर्मचाऱ्यांनी मोजक्या शेतकऱ्यांना थकीत रकमेचे धनादेश दिले.


हेही वाचा: भूमिगत गटारी 'ओव्हरफ्लो'; वसाहतींमध्ये दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात


डॉ. परदेशींनी घेतले फैलावर 

 जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी यांनी शेतकऱ्यांची भेट घेत कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत सर्वच शेतकऱ्यांच्या पैशांची तजवीज करा. अशी मागणी केली. शुक्रवारी या प्रश्नावर काहीच तोडगा न निघाल्याने शनिवारी देखील शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच होते. या प्रश्नावर शनिवारी उशिरापर्यंत तोडगा निघू शकला नव्हता.


वाचा: सत्यार्थी ई-पेपर‌


वाढदिवसाचे कौतुक किती?

गेल्या दोन दिवसांपासून जवळपास १०० शेतकरी उपोषण करीत आहेत. यातील काही उपोषणार्थींची प्रकृती खालावली आहे. अशा परिस्थितीत सभापतींनी वाढदिवसाचे कौतुक करीत फिरणे कितपत योग्य आहे? असा सवालही उपोषणार्थींनी उपस्थित केला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top
{\rtf1\ansi\ansicpg1252\deff0\nouicompat\deflang1033{\fonttbl{\f0\fnil\fcharset0 Calibri;}} {\*\generator Riched20 10.0.22621}\viewkind4\uc1 \pard\sa200\sl276\slmult1\f0\fs22\lang9 \par }