नागरिकांचे आरोग्य धोक्यात
वैजापूर शहरातील भूमिगत गटारींसह खुल्या गटारींची साफसफाई होत नसल्याने विविध नागरी वसाहतींमध्ये दुर्गंधी सुटली असून नागरिकांची ओरड सुरू झाली असतानाही पालिका प्रशासनाला हा टाहो ऐकू जायला तयार नाही. ठिकठिकाणी गटारी 'ओव्हरफ्लो' होऊन पाणी वाहत असल्याने दुर्गंधी सुटून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरातील भूमिगत गटारींसह खुल्या गटारींच्या पाण्यासह ठिकठिकाणी साचलेल्या केरकचऱ्यामुळे शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली असून पालिका प्रशासनाने या नागरी सुविधांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. शहरातील विश्वनाथनगरसह लक्ष्मीनगरमधील गटारींची गेल्या कित्येक दिवसांपासून साफसफाई न झाल्याने चेंबर ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी खुल्या गटारींमध्ये साचून दुर्गंधी येत आहे. हिच अवस्था शहरातील बहुतांश वसाहतींमध्ये आहे. याबाबत नागरिकांनी पालिकेतील कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही मुजोर कर्मचारी त्यांचं गाऱ्हाणे ऐकायला तयार नाही. संबंधित नागरिक माजी नगरसेवकांना आपबिती सांगतात. परंतु नगलसेवकांचा कार्यकाळ संपलेला असल्यामुळे पालिका प्रशासन त्यांनाही 'मोजायला' तयार नाही.
शहरातील नाईकवाडी गल्लीत नाली बुजलेली असल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शहरातील शांतीनगरमध्येही नागरिक वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे त्रस्त होते. वारंवार लेखी निवेदने देऊनही पालिकेला जाग येत नव्हती. मोठ्या पाठपुराव्यानंतर तेथे पालिकेकडून उपाययोजना करण्यात आली. दरम्यान शहरातील बहुतांश वसाहतींमध्ये कमीजास्त अशीच परिस्थिती आहे.
हेही वाचा - शेतीच्या बांधावरून तरुणाचा खून
महिनोन्महिने शहरात साफसफाईच्या नावाने बोंबाबोंब सुरू असताना पालिका प्रशासन हातावर हात ठेवून मुग गिळून गप्प आहेत.प्रशासकांचा सफाई कामगारांवर वचक नसल्याने शहरात सफाईच्या नावाने 'आनंदी आनंद गडे, चोहिकडे' परिस्थिती आहे. मुळात पालिकेने मुलभूत प्रश्नांकडे लक्ष केंद्रित नागरिकांना सुविधा पुरविणे गरजेचे आहे. परंतु पालिका प्रशासन गेल्या काही दिवसांपासून केवळ 'पाट्या' टाकून नागरिकांची बोळवण करीत आहेत. परिणामी नागरी समस्यांची जटिलता वाढून त्या अधिक तीव्र होतील.
हेही वाचा - 'ती' शिकवणीसाठी जात होती अन् वाहनाच्या धडकेत सर्व काही क्षणार्धात संपलं!
- साहेबराव साळुंके, सेवानिवृत्त प्राचार्य, विश्वनाथनगर, वैजापूर
- अॅड नुजहत सय्यद, नाईकवाडी गल्ली, वैजापूर