चोऱ्यांच्या घटना वाढल्या
वैजापूर शहरासह तालुक्यात परप्रांतीयांचे लोंढे वाढले असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते ठाण मांडून आहेत. वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने ते तालुक्यात वास्तव्यास आहेत. अनेकांनी शहरासह ग्रामीण भागात घरं किरायाने घेऊन वर्षानुवर्षांपासून ठाण मांडले आहेत. परंतु याबाबत वैजापूरसह शिऊर व वीरगाव पोलिस ठाण्यात कोणत्याही नोंदी उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन किती 'सतर्क' याची प्रचिती येते.
घर किरायाने देताना संबधितांच्या आधारकार्डासह आवश्यक कागदपत्रे घेऊन नजीकच्या पोलिस ठाण्यात नोंद करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येते. परंतु या नियमाला घरमालकांसह पोलिस प्रशासनानेच हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. घरमालक किरायादारांची माहिती पोलिस ठाण्यात देण्यास टाळाटाळ करतातच. परंतु पोलिस प्रशासनही तेवढे जागरूक नाही. हे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे नियम कागदोपत्रीच आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
हेही वाचा: अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला संपवलं! पतीला जन्मठेप
परप्रांतीय म्हणजे सराईत गुन्हेगार प्रवृत्तीचे असतात किंवा आहे. असे जरी नसले तरी पोलिसांनी माहिती म्हणून त्यांचा डाटा जमा करून ठेवणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांपासून शहर व परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र पोलीस या चोरट्यांपर्यँत पोहोचण्यास अपयशी ठरले आहेत. या घटनांचा मागोवा घेतल्यास तालुक्याच्या हद्दीतील तिन्ही पोलिस ठाण्यात परप्रांतीय कामगार, परिसरात नव्याने रहिवासास आलेले भाडेकरूंची पोलिसांकडे कोणतीही नोंद नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जर परिसरात चोऱ्यांसह वाढती गुन्हेगारी रोखायची असेल तर याबाबत पोलिस प्रशासनाने अद्यावत असणे गरजेचे आहे.
हेही वाचा: आमदार रमेश बोरनारे शब्दाला 'जागले'
वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दित ५८, शिऊर हद्दित ६३ व वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४३ गावे आहेत. परंतु तिन्हीही पोलिस ठाण्यात परप्रांतीय मजूर, फेरीवाले अथवा नव्याने वास्तव्यास आलेल्या भाडेकरूंची कोणतीही नोंद नाही. या ठाण्यांकडे तर परप्रांतीयांची माहिती उपलब्ध नाहीच. परंतु उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाकडे देखील याबाबत कोणताही तपशील उपलब्ध नाही. तालुक्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडे ही माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात देखील पोलिस प्रशासनाला याचा फायदा होईल. दरम्यान पोलिस प्रशासनाइतके नागरिकही बेजबाबदार असून ग्रामीण भागात कापूस वेचणीसाठी येणारे परप्रांतीय मजूर, फेरीवाले शहरातील हॉटेलमध्ये कामासाठी येणारे कामगार याबाबत कुणीही पोलिसांना माहिती देत नाही. किंबहुना पोलिसांकडून देखील याबाबत कोणतीही जनजागृती करण्यात येत नाही अथवा कठोर नियमावली करण्यात आली नाही. जर नागरिकांना पोलिस ठाण्यात जाणे शक्य नसेल तर ऑनलाईन देखील याबाबत नोंद करता येऊ शकते.
घरमालकांनी त्यांच्याकडे रहिवासास असलेल्या भाडेकरूंचे आधार कार्ड व फोटो हद्दीतील पोलिस ठाण्यात जमा करणे अनिवार्य आहे. शासनाचे तसे निर्देश देखील आहेत. परंतु याबाबत कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही. एकूणच पोलिसांच्या गोपनीय शाखेकडे याबाबत सर्व माहिती असणे गरजेचे आहे. वैजापूरात पीओपी काम, सुतार काम, कापूस वेचणी मजूर, हॉटेलिंग व्यवसायातील कामगार या कामांसाठी बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड यासारख्या राज्यातून जथ्थे येतात व जातात मात्र कोण व कुठून कधी येतात व जातात ?याची पोलिस प्रशासनाला भणक देखील लागत नाही. दरम्यान तालुक्याचा वाढता विस्तार पाहता याबाबत आतातरी पोलिस प्रशासनाने सजग होणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात प्रशासनाला याची मदतच होईल.
'त्या' घटनेत परप्रांतीयांचाच हात!
शहरातील म्हसोबा चौकात असलेल्या आयडीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडून चोरट्यांनी १६ लाखांची रोकड लंपास केल्याची घटना १७ जानेवारी २०२४ रोजी पहाटेचा सुमारास घडली. याशिवाय ०१ जून २०२४ रोजी पुन्हा याच बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी ११ लाख ३९ हजार रुपयांवर डल्ला मारला होता. चोरीच्या या दोन्ही घटनेत परप्रांतीय चोरटे च असल्याचा कयास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावला होता. त्यामुळे या गोष्टी अशा घटनांना पुष्टी करणाऱ्या आहेत.
पोलिस यंत्रणाच अनभिज्ञ!
उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे परप्रांतीयांची माहिती उपलब्ध नाहीच. परंतु वैजापूरसह शिऊर व वीरगाव पोलिस ठाण्यातही याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ घरमालकांना जबाबदार धरून चालणार नाही. पोलिसांचाच जिथे कानाडोळा आहे. तिथे सामान्यांकडून अपेक्षा करण्यात फारसा अर्थ नाही.
परप्रांतीयांच्या माहितीसाठी तुम्ही संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क करायला हवा. माझ्याकडे याची कोणतीच माहिती नाही. माहिती संकलन करणे सुरू आहे.
-भागवत फुंदे , उपविभागीय पोलिस अधिकारी, वैजापूर
0 Comments