Municipal Administration | स्वच्छतेचे धिंडवडे: 'नाल्या दाखवा अन् बक्षीस मिळवा'; शहर आहे की जंगल? नागरिकांचा सवाल

0

वर्षानुवर्षांपासून सफाईच नाही



वैजापूर शहरात नागरी सुविधांबाबत ठणठणाट असतानाच स्वच्छतेचेही धिंडवडे निघाले आहेत. नाल्यांची सफाई होत नसल्याने बहुतांश वसाहतींमध्ये दुर्गंधी सुटली आहे. एवढेच नव्हे तर डीपी रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या नाल्यांची वर्षीनुवर्षींपासून या नाल्यांमध्ये डोक्यापेक्षा जास्त गवत वाढले आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता साफसफाईच नसल्याने सांडपाणी जाणार कसे? त्यामुळे हे शहर आहे की जंगल? असा भास नागरिकांना होत आहे. या रस्त्यावर 'नाल्या दाखवा अन् बक्षीस मिळवा' अशी परिस्थिती उद्भवली आहे.


शहराची वाढती लोकसंख्या व वाढता विस्तार पाहता पालिका प्रशासनाने सजग राहण्याची अपेक्षा असतानाच पालिकेचा कारभार ढेपाळला आहे. दिवसेंदिवस नागरी सुविधांबाबत नागरिकांना संघर्ष करण्याची वेळ आली आहे. नागरी सुविधांसह स्वच्छतेबाबत पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. शहरातील घाणीच्या साम्राज्यात वावरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. घाणीचे साम्राज्य, ठिकठिकाणी केरकचरा, मोकाट डुकरांसह जनावरांचा मुक्त संचार, तुडुंब भरून वाहणाऱ्या गटारी, बेजबाबदार प्रशासक अशीच ओळख शहराची बनली आहे. या समस्यांमुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.


 दरम्यान शहरातील वैजापूर - गंगापूर राज्य महामार्गावरील डीपी रस्त्याच्या कडेला दुतर्फा असलेल्या नाल्यांची अवस्था भयावह झाली आहे. अक्षरशः नाल्या शोधण्याची वेळ आली आहे. नाल्यांमध्ये वाढलेल्या डोक्यापेक्षा जास्त गवतामुळे सफाईसाठी पालिकेला अगोदर नाल्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपूवीच हा परिसर नव्याने वसलेला आहे. या रस्त्यावर नव्याने काही व्यवसायही सुरू झाले आहे. याशिवाय नागरी वसाहती आहेत. नव्याने वसलेल्या परिसरात पालिकेच्या अशा अ'सुविधा' असतील तर जुन्या शहरातील परिस्थितीबाबत कल्पना न केलेलीच बरी!


 नाल्यांतील गवताचे टेपने तंतोतंत मोजमाप जरी केले तरी डोक्यापेक्षा कमी उंची गवताची भरणार नाही. तसेच रस्त्याच्या कडेला नाल्या आहेत. याचा वाहनचालकांना जराही अंदाज येत नाही. याचाच अर्थ या नाल्या वर्षानुवर्षांपासून साफ केल्या नाहीत. याची ढळढळीत प्रचीती येते. नाही म्हणायला आता या परिसरात भूमिगत गटारींचे बांधकाम सुरू झाले आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की, नाल्यांमधील गवतासह झाडाझुडुपांची साफसफाई करू नये? नाल्यांची सफाई नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटून डासांनी उच्छाद मांडला आहे. धूरफवारणीच्या नावाने बोंबाबोंब असताना आजारांना निमंत्रण मिळत आहे. 'स्वच्छ शहर, सुंदर शहर' या घोषवाक्याला पालिकेनेच सुरूंग लावला आहे. अशा बेगडी स्वच्छतेचे धडे गिरवणाऱ्या पालिकेला स्वच्छतेचे महत्त्व कुणी पटवून सांगायचे? हाच खरा प्रश्न आहे.


केवळ 'खुर्ची'वर बसून सोडतात 'फर्मान'

शहरात समस्यांचा डोंगर उभा असताना पालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी हातावर हात ठेवून बसलेले आहेत. गलेलठ्ठ वेतन घेऊन सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचे अघोरी पातक करीत आहेत. 'खुर्ची' न सोडता कनिष्ठ कर्मचाऱ्यांना केवळ फर्मान सोडण्याचे काम करतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरात फेरफटका मारून नागरिकांच्या काय समस्या आहेत? याची कधीही शहानिशा करून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे शहरवासियांच्या समस्यांची जाणीव अधिकाऱ्यांना कशी असणार? 


राष्ट्रीय महामार्गावरील नाल्याही 'फुल'

शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील दुतर्फा असलेल्या भूमिगत गटारींची कमीजास्त अशीच परिस्थिती आहे. अपवाद वगळता गेल्या कित्येक वर्षांपासून या गटारींची सफाई झालेली नाही. नाल्यांवरील ढापे केवळ शोभेचे बनले असून सफाईसाठी हे ढापे कधी उघडले गेले. असे कधीच निदर्शनास आले नाहीत. एकंदरीतच नाल्यांच्या सफाईचा विषय ऐरणीवर आलेला असताना पालिका प्रशासन 'कुंभकर्णी' झोपेत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top
{\rtf1\ansi\ansicpg1252\deff0\nouicompat\deflang1033{\fonttbl{\f0\fnil\fcharset0 Calibri;}} {\*\generator Riched20 10.0.22621}\viewkind4\uc1 \pard\sa200\sl276\slmult1\f0\fs22\lang9 \par }