शेअर बाजारातून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने तिघांनी मिळून एकाला २२ लाखाला गंडा घातल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद उत्तमराव पाटील (रा. तिरुपतीनगर, धुळे, ह.मु. पुणे), सुनील गंगाधर पाटील, नवनीत हिरालाल पाटील (दोघे रा. नागलवाडी ता.चोपडा, जि. जळगाव ह.मु.पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील शिवाजी पाटील हे तालुक्यातील जांबरगाव येथील रहिवासी आहेत. ते महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित या संस्थेत कापूस प्रत निर्देशक-ग्रेडर म्हणून नोकरीस होते. मे २०२२ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांना ५० लाख रुपये मिळाले. दरम्यान सुनील पाटील यांचा पुतण्या विनोद पाटील हा सध्या पुणे येथे रहिवासास असून तो व त्याच्यासोबत सुनील गंगाधर पाटील आणि त्याचा नातलग विनोद पाटील या तिघांनी मिळून सन २०२० मध्ये अर्थप्लस इन्व्हेस्टमेंट नावाची एजन्सी सुरू करून शेअर बाजाराशी संबंधीत काम करतात.
दरम्यान तक्रारदार सुनील पाटील यांची मुलगी तेजल व जावई हे देखील पुणे येथे रहिवासास असून सन २०२१ मध्ये त्यांच्या मुलीने 'त्या' तिघांकडे पैसे गुंतवणूक केले होते. त्यावेळी त्यांनी तेजल हिला चांगला परतावा दिला. ही बाब तेजलने आईला सांगितली. यावरून तक्रारदार सुनील पाटील यांनीही 'त्या' तिघांशी संपर्क साधला. 'आम्ही तुम्हाला दरमहा चार टक्के मुद्दल व चार टक्के व्याज असा परतावा देऊ' असे आमिष त्यांनी सुनील पाटील यांना दाखवले. यामुळे सुनील पाटील यांनी त्या तिघांना चाळीस लाख रुपये दिले. यापैकी त्यांनी सुनील यांना मार्च २०२३ पर्यँत १७ लाख २६ हजार ५०० रुपये परताव्यापोटी दिले.
त्यानंतर सुनील पाटील यांनी उर्वरीत रकमेची चौकशी केली असता 'ज्या व्यक्तीकडे आम्ही पैसे गुंतविले आहे . त्याने मोठया रकमेचा अपहार करून तो पळून गेला आहे' असे उत्तर त्यांनी त्यांना दिले. अखेर २२ लाख ७३ हजार ५०० रुपये एवढ्या रकमेची आपली फसवणूक झाल्याची बाब सुनील पाटील यांना समजली. लगेचच त्यांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठत तिघांविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments