प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण
वैजापूर शहरातील सार्वजनिक नाल्यांवरील नागरिकांनी बांधकाम करून केलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले असून या बांधकामामुळे पाणी साचून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचे पालिकेकडून नागरिकांना बजाविण्यात आलेल्या नोटीसीत म्हटले आहे. दरम्यान गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिकांनी नाल्यांवर बांधकामे करून या जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु नाल्यांवरील बांधकामांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा साक्षात्कार अचानक पालिका प्रशासनाला झाला. ही पालिकेची तत्परता म्हणायची की उशिरा सुचलेले शहाणपण? परंतु हरकत नाही. ही कारवाई म्हणजे 'देर आएं, दुरूस्त आए' अशी काहीशी म्हणावी लागेल.
पालिका प्रशासनाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे शहरात नागरी सुविधांचे धिंडवडे निघाले आहेत. तत्कालीन मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या बदलीनंतर नूतन मुख्याधिकाऱ्यांनी नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केले असून पालिकेकडून केवळ 'पाट्या' टाकण्याचे काम सुरू आहे. प्रशासकराजच्या अनागोंदीमुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आले असून भूमिगत गटारींसह खुल्या गटारींची अस्वच्छता, मोकाट कुत्रे, डुक्कर व जनावरांचा मुक्त संचार, फळविक्रेत्यांची अतिक्रमणे व ठिकठिकाणी शहरात साचलेला आदी विविध समस्यांची लांबलचक यादीच सध्या चव्हाट्यावर आली आहे.
दरम्यान पालिका प्रशासनाने शहरातील नाल्यांवरील बांधकामे पाडण्याबाबत नागरिकांना नोटीस बजावली आहे. ही कारवाई नक्कीच स्वागतार्ह म्हणावी लागेल. शहरात बहुतांश ठिकाणी नागरिकांनी गटारींवर बांधकामे करून जागा हडप करण्याचा सपाटा लावला आहे. या अतिक्रमणांना वेळीच आवर घातला गेला असता तर पालिका प्रशासनावर ही वेळ आलीच नसती. यासाठी पालिकेचे तत्कालीन अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. गटारींवर अतिक्रमणे झाल्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन ते साचले जाते. परिणामी पाणी गटारींमध्ये तुंबून डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अलिकडच्या कित्येक महिन्यात पालिकेकडून डास निर्मूलनासाठी कोणती फवारणी अथवा उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. पालिकेकडून नागरिकांना नोटीस बजावली खरी. परंतु या सार्वजनिक गटारींवरील अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेला मुहूर्त कधी लागणार? हा मात्र औत्सुक्याचा विषय आहे.
काय म्हटले आहे नोटीसीत?
दरम्यान शहरातील नाल्यांची पाहणी केली असता आपण केलेल्या बांधकामामुळे नाली स्वच्छ करण्यासाठी अडचण येत आहे. नाली स्वच्छ न झाल्यामुळे त्या परीसरातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब गंभीर असून आपण नालीवर केलेले आपले खासगी बांधकाम ही नोटीस मिळताच ३ दिवसांच्या आत काढून घ्यावे अन्यथा नाईलाजास्तव नगर परिषद कार्यालयास सदरचे अनधिकृत बांधकाम स्वःखर्चातून काढून घ्यावे लागेल व सदरचा खर्च हा आपणाकडून वसूल करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. करीता आपणास सूचित करण्यात येते. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
गटारींची जागा बळकावली
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. बहुतांश भागात ही कामे आटोपली आहे तर काही ठिकाणी सुरू आहे. ज्या भागात भूमिगत गटारींचे कामे आटोपल्यानंतर तेथे लगेचच रस्त्यांची कामेही करण्यात आली. भूमिगत गटारी व रस्त्यांची कामे उरकल्यानंतर दुतर्फा असलेल्या खुल्या गटारींवर मुरूम टाकून ही जागा वापरात घेतली आहे. या गटारी बुजवत असताना पालिकेकडून नागरिकांना कोणताही अटकाव केला जात नाही. त्यामुळे शहरात बहुतांश ठिकाणी आपल्या मालकीची जागा समजून नागरिकांनी जागा वापरात घेत आहेत. अशा ठिकाणीही पालिकेने कारवाई करण्याची गरज आहे.