पदरातून दिले ६८ लाख
अडत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची फसवणूक दोन कोटी रुपयांचा चुना लावल्याचे प्रकरण गेल्या तीन महिन्यांपासून गाजत आहे. या प्रकरणाचा तिढा सोडविण्यात आमदार रमेश बोरनारे यांना यश आले असून त्यांनी स्वतःच्या पदरचे जवळपास ६८ लाख रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम १८ जानेवारीपासून बाजार समितीत वाटप करणे सुरू झाले आहे. त्यामुळे तूर्तास कांद्याच्या प्रकरणावर पडदा पडला आहे. 'कांद्याची रक्कम मिळावी नाही तर मी खिशातून शेतकऱ्यांना पैसे देईन' असा शब्द आमदार बोरनारेंनी दिला होता. त्यांनी हे उत्तरदायित्व स्वीकारून हा शब्द खरा करून दाखविला.
अडत व्यापाऱ्याने ४०० शेतकऱ्यांच्या कांद्याची दोन कोटी रुपये डुबविल्याचे प्रकरणावरून गेल्या तीन महिन्यांपासून रणकंदन सुरू होते आहे. गेल्या सहा शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन उपोषणास्त्राचा अवलंब करीत नंतर थेट जलकुंभावर जाऊन दिवसभर ठिय्या दिला. अखेर बाजार समितीच्या संचालकांनी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी माघार घेत आंदोलनाला पूर्णविराम दिला. हा अंक येथे संपला असला तरी शेतकऱ्यांना रक्कम कुठून व कशी द्यायची? असा मोठा पेच बाजार समितीसमोर होता. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच विधानसभा निवडणुकीनंतर या प्रकरणावरून शेतकऱ्यांनी उचल खाल्ल्यानंतर आमदार रमेश बोरनारे यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. 'बाजार समितीकडून रक्कम मिळाली नाहीच तर मी खिशातून तुमचे पैसे देईल'. असा शब्द त्यावेळी दिला होता. परंतु दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शेतकऱ्यांनी आक्रमक होत आमदार बोरनारेंच्या विरोधात विधाने करण्यासह काहींनी राजकारणही करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बोरनारे काही प्रमाणात या प्रकरणातून तटस्थ झाले. परंतु संचालकांच्या आग्रहाखातर त्यांनी पुढाकार घेऊन १८ जानेवारी रोजी शेतकऱ्यांची बाजार समितीच्या आवारात भेट घेऊन आपला निर्णय जाहीर केला. याप्रसंगी बोरनारेंनी आपली खदखद व्यक्त करीत या विषयावर राजकारण करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.
राजकीय रंग देण्याचा प्रयत्न
यावेळी आमदार रमेश बोरनारे म्हणाले की, १० जानेवारीपर्यंत मी शेतकऱ्यांना पैसे देण्याचा शब्द दिला होता. या शब्दावर मी आजही कायम आहे. परंतु शेतकऱ्यांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी मला भेटून निर्णय घ्यायला हवा होता. परंतु कुणाच्या तरी सांगण्यावरून या प्रकरणाला राजकीय रंग देणार असाल तर हे योग्य नाही. मी जरी मुंबईत होतो तरी माझा जीव इकडे अडकून होता. मी यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, पणनमंत्री व पणन संचालकांना भेटून हे 'शिजवून' आणण्याचा प्रयत्न करीत होतो. संबधितांना बाजार समितीकडून पत्रव्यवहार सुरू होता. परंतु हरकत नाही. आमच्या यादीनुसार एकूण ३६२ शेतकऱ्यांना पैसे देणं आहे. यापैकी १०६ शेतकऱ्यांना ३० लाख ५३ हजार ६६४ रुपयांचे वाटप करण्यात आले. आता २५६ शेतकऱ्यांना ४० टक्यांनुसार ६७ लाख ५६ हजार ६१९ रुपये वाटप आजपासून सुरू करण्यात आले आहे.
उर्वरित रकमेसाठी प्रयत्न करण्यात येतील. १ ते २७ आॅक्टोबर या कालावधीत संबंधित व्यापाऱ्याला ज्या शेतकऱ्यांनी कांदा दिला. तिच रक्कम दिली जाणार आहे. यापुढे अशी प्रकरणे होऊ नयेत म्हणून बाजार समितीला नियम व अटी कडक करण्याचा सूचना दिल्या आहेत. यावेळी रामहरी जाधव, संजय निकम, बाबासाहेब जगताप, कल्याण दांगोडे, काकासाहेब पाटील, देविदास वाणी, ज्ञानेश्वर जगताप, उल्हास ठोंबरे, गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन, प्रशांत सदाफळ आदी यावेळी उपस्थित होते.
आमदारांचा उपरोधिक टोला!
कुणीही उठतं आणि मी मुख्यमंत्र्यांना फोन केला अन् शेतकऱ्यांच्या पैशांचा मार्ग मोकळा झाला. असे सांगून आवई उठवतं. एवढं सोपं आहे का हे? असा प्रश्न उपस्थित करून जर फोनवरच हे काम झाले असतं तर मुख्यमंत्र्यांसह सर्वांना भेटायची गरजच काय? असा टोलाही त्यांनी लगावला. कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. असे आमदार बोरनारेंनी यावेळी ठणकावून सांगितले.
केवळ आमदारांमुळेच..!
शेतकऱ्यांच्या या गंभीर विषयात आमदार बोरनारे यांनी हात घालून पुढाकार घेतल्यानेच हे प्रकरण निवळले. त्यांनी पदरचे पैसे शेतकऱ्यांना देऊन मोठेपणा दाखविला. असे संचालकांनी यावेळी बोलून दाखविले.
0 Comments