'तो' रस्ता की पाणंद..? नागरिकांचा सवाल
वैजापूर - गंगापूर राज्य महामार्गावरील डीपी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांना घनदाट जंगलाची अवस्था प्राप्त झाली आहे. त्यापुढेच लागून असलेला इंदिरानगर ते नागपूर - मुंबई महामार्गाकडे जाणारा साधारणतः एक किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावरही दुतर्फा झाडांचे घनदाट जंगल वाढले आहे. जवळपास २० फुट रुंदी असलेला हा रस्ता अवघ्या १० फुटांवर येऊन अरुंद झाला आहे. दुतर्फा जवळपास पाच - पाच फुट जागा झाडांनी वेढल्याने या रस्त्यावरून आमनेसामने चारचाकी वाहने जाणे अवघड बनले आहे.
विशेष म्हणजे पालिकेने गेल्या काही दिवसांपूर्वी भूमिगत गटारीचे काम केले. काम केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने काम करतांना मखलाशी केली. या रस्त्यावर ठिकठिकाणी गटारींचे चेंबर बांधले खरे. परंतु काम आटोपल्यानंतर निघालेला मलबा बाजूला न सारता तसाच रस्त्यावर ठेवला. परिणामी एकतर्फा रस्त्यावरील मलब्यावर पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात घनदाट झाडे येऊन अक्षरशः जंगल झाले. पालिकेनेही हे. जंगल साफ करण्यासाठी तसदी घेतली नाही. विशेष म्हणजे हा रस्ता वर्दळीचा असून या रस्त्यावरच एक प्राथमिक शाळा देखील आहे. या शाळेत मोठ्या प्रमाणावर चिमुकले विद्यार्थी आहेत. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. याशिवाय या रस्त्यावरून माॅर्निंग व इव्हिनिंग वाॅक करणाऱ्या ज्येष्ठांसह तरुण, तरुणी व महिलांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे सायंकाळी दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलातून जाताना भीती वाटल्याशिवाय राहत नाही.
हेही पाहा - 'ती' शिकवणीसाठी जात होती अन् वाहनाच्या धडकेत सर्व काही क्षणार्धात संपलं!
पालिकेच्या रस्त्यावरून जाताना एखाद्या शेताकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावरून तर आपण जात नाही ना? असा भास नागरिकांना झाल्याशिवाय राहत नाही. डीपी रस्ता जेथे संपतो; तेथून पुढे नागपूर - मुंबई महामार्गापर्यंत या रस्त्याची अशीच स्थिती आहे. दरम्यान शहरात केरकचऱ्यांचे ढिगारे, नाल्यांची अस्वच्छता, त्यावरील वाढलेलं झाडांचे जंगल व विविध नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा पाहता वैजापूरकरांना आता पालिकेच्या कारभाराच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. परंतु पालिका प्रशासनाला जाग येईल तो सुदिन म्हणावा लागेल!
प्रशासक राजवटीत 'दाद' नाहीच
पालिकेच्या सदस्यांचा कार्यकाळ मे २०२३ मे मध्ये संपुष्टात आल्यानंतर वैजापूरकरांच्या नशीबी प्रशासकराज आले आणि तेव्हापासूनच फरपट सुरू झाली. अशुद्ध पाणीपुरवठ्यासह नागरी सुविधांबाबतच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना धाय मोकळून रडण्याची वेळ आली आहे. कुणालाही फोन करा. प्रशासक राजवटीत कुणीच दाद द्यायला तयार नाही. त्यामुळे या गलथान कारभाराच्या विरोधात बहुतांश नागरिकांनी आता चंग बांधून मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्याच्या तयारीत आहेत.
रस्त्याचे झाले 'डंपिंग ग्राउंड'
डीपी रस्ता संपल्यानंतर पुढे सुरू होणाऱ्या रस्त्याचे अक्षरशः 'डंपिंग ग्राउंड' झाले आहे. डीपी रस्त्यावरून जाताना डाव्या बाजूला झालेला उकिरडा पाहून खरंच हे शहर आहे का? असा प्रश्न पडून हा 'नजारा' पालिकेला का दिसत नसावा? असा प्रत्येकजण मनात फुटफटत असावा. या परिसरातील नागरिक तेथेच केरकचरा टाकीत असल्याने या उकिरड्यावर डुकरांसह मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट असतो. ते येणाऱ्या जाणाऱ्यांवर गुरगुरल्याशिवाय राहत नाही. पालिकेकडून हा कचरा कित्येक दिवस उचलल्या जात नसल्यामुळे दुर्गंधी सुटून नागरिकांना नाक दाबून ये - जा करण्याची वेळ आली आहे.