धनादेशावर स्वाक्षरीच नाही
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात दोन कोटी रुपयांचे कांदा विक्री करणाऱ्या ४०० शेतकऱ्यांना पैसे न देताच व्यापाऱ्याने धूम ठोकल्याचे प्रकरण तीन महिन्यांपूर्वी घडले होते. दरम्यान या प्रकरणानंतर बाजार समितीने शेतकऱ्यांना १० जानेवारीपर्यंत पैसे देण्याची हमी दिली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी बाजार समितीच्या कार्यालयात चकरा मारीत असताना त्यांना कोलून लावले जात आहे. शेतकरी या कार्यालयात गेले असता कर्मचारी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते नाॅट रिचेबल असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यापुढचा कहर म्हणजे बाजार समितीने काही शेतकऱ्यांना धनादेश दिले. त्या धनादेशावर स्वाक्षरीच नसल्याचे समोर आले आहे. व्यापाऱ्याने तर शेतकऱ्यांची फसवणूक केलीच. परंतु बाजार समितीनेही धनादेशावर स्वाक्षरी न करता शेतकऱ्यांना ठगविले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही महिन्यांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात चांगलाच घोळ सुरु आहे. शेतकऱ्यांनी कांदा विक्री करूनही त्यांना रोख रक्कम न देता अडत व्यपारी धनादेश देत आहे. कांदा मार्केटमधील साई बालाजी ट्रेडिंग कंपनीचा अडत व्यापारी सागर राजपूत याच्याकडे साधारणतः तीन महिन्यांपूर्वी तालुक्यातील ४०६ शेतकऱ्यांनी तब्बल दोन कोटी ५ लाख ७५ हजार ४९७ रूपयांचे कांदे विक्री केले होते. विक्री केलेल्या कांद्याच्या रकमेपोटी यातील काही शेतकऱ्यांना पुढील तारखेंचे धनादेश देण्यात आले होते.
हेही वाचा: अन् 'त्याने' पोलिस ठाण्यातच घेतले विष; वाहन पकडणं लागले जिव्हारी
परंतु त्या - त्या तारखेचे धनादेश शेतकऱ्यांनी बॅंकेत वटविण्यासाठी टाकले असता सागर राजपूत याच्या बॅंक खात्यावर रक्कमच नसल्याचे बॅंक व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना सांगितल्यामुळे त्यांना माघारी परतण्याची नामुष्की ओढवली. अडत व्यापाऱ्याची ही 'हेराफेरी' लक्षात आल्यानंतर दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटला टाळे ठोकले होते. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने मध्यस्थी करीत शेतकऱ्यांना पुढील वायदा देण्यात आला होता. परंतु दीड महिन्याचा कालावधी उलटूनही अडत व्यापारी राजपूत याने शेतकऱ्यांची रक्कम न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी २५ नोव्हेंबर रोजी पुन्हा बाजार समिती गाठून सभापतींसह सचिवांना घेराव घातला होता.
हेही वाचा: 'तिचा' बळी गेल्यानंतर पालिकेला 'जाग'; झाडांची केली छाटणी
दरम्यान याप्रकरणी सागर राजपूत याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या धुमश्चक्रीत शेतकरी आक्रमक झाल्यानंतर आमदार रमेश बोरनारे यांनी मध्यस्थी करून बाजार समितीच्या आवारात बैठक घेऊन १० जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना कांद्याचे चुकारे करण्यात येतील. याची हमी बाजार समितीने घेतली असल्याचे त्यांनी तेव्हा सांगितले होते. परंतु १० जानेवारी रोजी कांद्याची रक्कम मिळणार असल्याने शेतकरी गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीच्या कार्यालयात चकरा मारीत असताना संबंधित जबाबदार कर्मचारी गायब असून त्यांचे भ्रमणध्वनी नाॅट रिचेबल आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
हेही वाचा: भूमिगत गटारी 'ओव्हरफ्लो'; वसाहतींमध्ये दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
समितीचा 'नहेला पे दहेला'
विजय कारभारी हिवाळे या शेतकऱ्याला बाजार समितीने कांद्याच्या रकमेपोटी ३७ हजार १०९ रुपयांचा धनादेश दिला खरा. परंतु या धनादेशावर बाजार समितीच्या सचिव अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नाही आणि शिक्काही नाही. त्यामुळे हा धनादेश बॅंकेत वटणार कसा? व्यापाऱ्याने तर शेतकऱ्यांची फसवणूक तर केलीच. परंतु बाजार समितीनेही शेतकऱ्याला विना स्वाक्षरीचा धनादेश देऊन फसवणूक करीत 'नहेला पे दहेला' केला आहे.
डेडलाईन संपली
बाजार समितीने शेतकऱ्यांना १० जानेवारीपर्यंत कांद्याची रक्कम देण्याची डेडलाईन दिली होती. परंतु ही डेडलाईन संपूनही अपवाद वगळता बहुतांश शेतकऱ्यांचा पदरात रक्कम पडलेली नाही. व्यापाऱ्याने केलेल्या पातकाचे बाजार समितीने 'पितृत्व' स्वीकारून पैशांची हमी घेतली खरी. परंतु बाजार समितीच आता हात वर करण्याच्या बेतात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजून किती दिवस थांबायचे? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.