व्यापाऱ्याने गंडविल्याचे प्रकरण; प्रशासन हादरले
अडत व्यापाऱ्याने ४०० शेतकऱ्यांच्या कांद्याची दोन कोटी रुपये डुबविल्याचे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत आहे. बाजार समिती प्रशासनाकडून दखल घेत नसल्याने उपोषणार्थींनी १६ जानेवारी टोकाचे पाऊल उचलित थेट जलकुंभावर चढत शोले स्टाईल आंदोलन केले. दरम्यान सकाळच्या उपोषणार्थी बाजार समितीच्या आवारातून अचानक गायब झाल्याने बाजार समिती प्रशासनासह सर्वांचीच पाचावर धारण बसली. दरम्यान १६ जानेवारी रोजी रात्रीपर्यंत आंदोलक जलकुंभावरच ठाण मांडून बसले होते. बाजार समितीच्या आश्वासनानंतर ते जलकुंभावरून खाली उतरले.
याबाबत अधिक माहिती अशी की, अडत व्यापारी सागर राजपूत याने तालुक्यातील ४०० शेतकऱ्यांना दोन कोटींचा चुना लावून हात धुवून घेतले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कांद्याची रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणादरम्यान बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या मॅरेथॉन बैठकांसह मोठा खल सुरू आहे. याच दरम्यान पणन संचालकांसह सहायक निबंधक व जिल्हा उपनिबंधकासोबतही समितीचा पत्रव्यवहार सुरू आहे.
हेही वाचा: 'तो' चिमुकला शेतात खेळत होता अन् बिबट्याच्या हल्ल्यात होत्याचं नव्हतं झालं!
निधीतून शेतकऱ्यांना रक्कम वितरित करण्याबाबत बाजार समितीने पणन संचालकांकडे परवानगी मागितली. परंतु पणन संचालकांनी तो चेंडू पुन्हा बाजार समितीकडे टोलवून याबाबत आपल्या स्तरावरून योग्य तो निर्णय घ्यावा. असा बचावात्मक पवित्रा घेत सल्ला दिला. त्यामुळे बाजार समिती प्रशासन अजूनही बुचकळ्यात पडले. पणन संचालकांनी चेंडू समितीकडे टोलवून अलगद राहण्याचा प्रयत्न केला. परिणामी बाजार समिती प्रशासन ठोस निर्णय घेण्यास असमर्थ ठरत आहे. दुसरीकडे आंदोलक शेतकरी दिवसेंदिवस आक्रमक होत असून 'आम्हाला आमची रक्कम द्या' या मागणीवर ठाम आहेत.
हेही वाचा: बाजार समितीचा 'चेंडू' टोलविला; काय म्हणाले पणन संचालक बघा!
दरम्यान १६ जानेवारी रोजी सकाळी बाजार समितीच्या आवारातून काही आंदोलक शेतकरी अचानक गायब झाल्याने मोठी धावपळ उडाली. नंतर त्यांचा शोध घेतला ते थेट शहरातील फुलेवाडी रस्ता परिसरातील जलकुंभावर जाऊन त्यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केल्याचे निदर्शनास आले. पाहता पाहता तेथे नागरिकांची गर्दी झाली. पोलिसांचा फौजफाटाही तेथे आला. शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याने एकच गोंधळ उडाला.
हेही वाचा: हजारोंचा नायलॉन मांजा पकडला!
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) तालुकाध्यक्ष मंजाहरी गाढे, धनंजय धोर्डे, अजय साळुंके, नंदकिशोर जाधव आदींनी तेथे जाऊन भेट दिली. याशिवाय पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे व सहकाऱ्यांचा मोठा पोलिस बंदोबस्त होता. तसेच बाजार समितीच्या आवारातही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान दुपारी संचालक मंडळाची बैठक झाली. परंतु यातून काहीच निष्पन्न झाले नव्हते. दरम्यान शेतकऱ्यांना आश्वासन दिल्यानंतर ते रात्री उशिराने जलकुंभावरून खाली उतरले.
हेही वाचा: बाजार समिती: 'आम्ही सारे खवय्ये'
'त्या' पत्रामुळे उडाली धांदल
आंदोलक शेतकरी जेव्हा बाजार समितीच्या आवारातून गायब झाले. तेव्हा कर्मचाऱ्यांना अचानक धक्का बसला. त्यांनी आंदोलकांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु उपोषणस्थळी एक पत्र मिळाले. 'आम्ही सामूहिक आत्मदहन करीत' असल्याचे त्यात लिहिलेले होते. त्यानंतर धावपळ सुरू झाली. शोधाशोधीनंतर ते थेट जलकुंभावर गेल्याचे त्यांना समजले.
असा ठरला फाॅर्म्युला
ज्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला कांदा दिला होता. त्यांना बाजार समिती आता ४० टक्के रक्कम वितरित करणार असून उर्वरीत रक्कम जिल्हा उपनिबंधकांच्या परवानगीनंतर देण्याचे आश्वासन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी माघार घेऊन आंदोलन थांबविले.
शासनामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू असून यासाठी दोन न्यायाधिकरण नियुक्त केले आहेत. संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याच्याकडूनही वसुलीसाठी प्रयत्न केला जात आहे. बाजार समितीचे संचालक मंडळ शेतकऱ्यांना रक्कम वितरित करण्याबाबत ठराव पारित करून निर्णय घेऊ शकते. हा त्यांचा अधिकार आहे. परंतु निर्णय योग्य व कायद्याच्या चौकटीतील असावा.
- डॉ. मुकेश बारहाते, जिल्हा उपनिबंधक, छत्रपती संभाजीनगर
0 Comments