चिंचडगाव येथील घटना; दोघांना ठोकल्या बेड्या
शेतीच्या बांधाच्या वादातून झालेल्या लाठ्याकाठ्यांनी केलेल्या मारहाणीत एका ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याचा खून केल्याची खळबळजनक घटना ६ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
सुनील कडुबा वाघ ( ३० रा. चिंचडगाव) मृत तरुणाचे नाव तर विजय पुंजाहरी वाघ व पोपट (भावड्या) लहानू वाघ (दोघे रा. चिंचडगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील मृत सुनील कडुबा वाघ (३०) हा चिंचडगाव येथील रहिवासी होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याचा व पोपट वाघ या दोघांमध्ये शेतीच्या बांधावरून वाद झाला होता. हा वाद सुनील यांचे मेहुणे हिंमत भोसले व अन्य नातेवाईकांनी तो वाद मिटविला होता.
०६ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गावचे सरपंच शरद बोरनारे यांनी हिंमत भोसले यांना फोन करून सांगितले की, 'तुमचा शालक सुनील हा गावातील समाज मंदिरासमोर पडलेला असून तो हालचाल करीत नाही.' ही माहिती मिळताच हिंमत भोसले हे पत्नीसह भामाठाण येथून येऊन घटनास्थळी धाव गेले. त्या ठिकाणी सुनील हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. यावेळी त्यांना समजले की, विजय वाघ याने काठीने तर पोपट (भावड्या) वाघ याने त्याला चापटबुक्याने जबर मारहाण केली.
मारहाणीत सुनील गंभीर जखमी झाला. त्याच अवस्थेत त्यांनी त्याला उपचारासाठी वैजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी हिंमत भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय वाघ व पोपट लहानू वाघ या दोघांविरुद्ध वीरगाव पोलिस खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे करीत आहेत.
'तो' एकटाच होता रहायला
घटनेतील मृत सुनील वाघ याची बहीण जिजा व मेहुणा हिंमत भोसले हे तालुक्यातील भामाठाण येथे रहिवासास आहेत तर सुनील यांची पत्नी मागील पाच वर्षांपासून माहेरी राहते. सुनील याच्या आईवडिलांचा देखील मृत्यू झालेला आहे. त्यामुळे चिंचडगाव येथे तो एकटाच रहिवासास होता.