Vaijapur Municipal Council | 'तिचा' बळी गेल्यानंतर पालिकेला 'जाग'; झाडांची केली छाटणी, मृत्यूला जबाबदार कोण?

0

वैजापूर शहरात संतापाची लाट 


वैजापूर शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील म्हसोबा चौकात भरधाव जाणाऱ्या पिकअपने एका शाळकरी मुलीचा बळी घेतला. या घटनेनंतर शहरात पालिका प्रशासनाविरुध्द तीव्र व संतप्त प्रतिक्रिया उमटून संतापाची लाट उसळली. म्हसोबा चौकातील दुभाजकावरील झाडांची गेल्या कित्येक महिन्यांपासून छाटणी न केल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. अखेर मुलीचा बळी गेल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली अन् दुभाजकावरील झाडांची छाटणी केली. परंतु असे असले तरी तिच्या  मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न कायम आहे.


हेही वाचा - भूमिगत गटारी 'ओव्हरफ्लो'; नागरिकांचे आरोग्य धोक्यात


शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील म्हसोबा चौकात भरधाव जाणाऱ्या पिकअपने सायकलवरून जाणाऱ्या श्रेया दुसाने या १५ वर्षीय मुलीला जोराची धडक दिल्याने ती जागीच ठार झाल्याची घटना ८ जानेवारी रोजी भल्या सकाळी ती शिकविणीसाठी जात असताना ही घटना घडली. या घटनेनंतर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरवात झाली. 


वास्तविक पाहता ही घटना कळीचा मुद्दा ठरत असली तरी गेल्या काही दिवसांपासून बेशिस्त पार्किंग, दुभाजकांवरील अडपसडप वाढलेली झाडे, फळविक्रेत्यांची फिरती अतिक्रमणेही अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. परंतु याबाबत पालिका प्रशासन आडमुठेपणाचे धोरण घेऊन दुर्लक्ष करीत आहेत. बुधवारी जी घटना घडली. त्या घटनेला दुभाजकावरील झाडे किती कारणीभूत आहे? हा विषय संशोधनाचा असला तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने वेळीच या झाडांची छाटणी करणे गरजेचे होते. पालिकेचे सर्वच बाबतीत दुर्लक्ष झाल्याने शहरवासियांच्या रोषाचे धनी व्हावे लागत आहे. नागरिकांची ओरड होत असतानाही अशा समस्यांकडे दुर्लक्ष करून आणखी किती जणांचे बळी घेणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. 


हेही वाचा - शेतीच्या बांधावरून तरुणाचा खून


साधारणतः दोन वर्षांपूर्वी शहरातील येवला रस्त्यावरील फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे प्रतीक्षा चौधरी या महिलेचा अपघात होऊन तिचा बळी गेला होता. त्यानंतर पालिकेने काही दिवस फळविक्रेत्यांना रस्त्यावर बसण्यापासून रोखले होते. परंतु पालिकेचे हे सातत्य फार दिवस न टिकता केवळ 'औट घटकेची' ही कारवाई ठरली. परिणामी काही दिवसांनंतर 'पहले पाढे पंचावन्न' या उक्तीनुसार फळविक्रेते पुन्हा ठाण मांडून बसायला लागले. मुळात शहरातील नागरिक सजग व जागृत नाहीत. असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. एखादी घटना घडल्यानंतरच सर्वांना जाग येते. श्रेयाचा बळी गेल्यानंतर समाज धुरिणांनी अचानक साक्षात्कार होऊन पालिकेसह पोलिस ठाणे व संबंधित विभागाकडे अर्जफाटे करून त्यांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न सुरू झाला. मुळातच अशा घटना घडू नये. यासाठी कुणीच प्रयत्न करताना दिसत नाहीत. एखादी घटना घडल्यानंतर आगडोंब उसळत असेल तर यांच्या संवेदना किती जागृत आहे? हाही प्रश्नच आहे. 


शहरात पालिका प्रशासनाचा अनागोंदी कारभार सुरू असताना शहरातील नागरिक ढिम्म आहेत. कालच्या घटनेमुळे नागरिकांना अचानक दुभाजकावरील झाडे वाढून अपघाताला निमंत्रण मिळत असल्याचा साक्षात्कार झाला. परंतु मुळातच अशा घटना घडू नये. यासाठी पालिका प्रशासनाइतकेच नागरिकांनीही सजग राहणे गरजेचे आहे. परिणामी अशा घटना टळून नाहक जाणारे बळी थांबतील!


उशिरा सुचलेले शहाणपण 

खेळण्या - बागडण्याच्या वयात श्रेयाचे अपघाती निधन तिच्या कुटुंबीयांना क्लेशकारक तर आहेच. परंतु भविष्यात आणखी कुण्या श्रेयाचा नाहक बळी जाणार नाही. यासाठी पालिका प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे. प्रशासनाने दुभाजकावरील झाडाझुडुपांची छाटणी केली खरी. परंतु झाडांची छाटणी यापूर्वीच केली असती तर यदाकदाचित श्रेयाचा बळी गेला नसता असाही एक मतप्रवाह आहे. या घटनेनंतर का होईना पालिकेने आपला परफाॅर्मन्स दाखवून झाडांची छाटणी केली. त्यामुळे पालिका बळी जाण्याची वाट बघत होते काय? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. पालिकेला हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल.



हेही वाचा -

'ती' शिकवणीसाठी जात होती; वाहनाने धडक दिली अन् क्षणार्धात सर्व काही संपलं!


पालिका प्रशासन उदासीन 

गेल्या काही दिवसांपासून विविध नागरी समस्यांबाबत नगरपालिका प्रशासन उदासीन आहे. शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकांवरील वाढलेल्या झाडांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे शहरातील काही नागरिकांनी पालिका प्रशासनाला निवेदन देऊन दुभाजकांवरील झाडे छाटण्याची मागणी केली आहे.



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top
{\rtf1\ansi\ansicpg1252\deff0\nouicompat\deflang1033{\fonttbl{\f0\fnil\fcharset0 Calibri;}} {\*\generator Riched20 10.0.22621}\viewkind4\uc1 \pard\sa200\sl276\slmult1\f0\fs22\lang9 \par }