वैजापूर न्यायालयाचा निर्णय
चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८ नुसार दाखल झालेल्या धनादेश अनादरण प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश वैजापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. पिसाळ यांनी दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकरणातील फिर्यादी व आरोपी हे नातेवाईक आहेत. फिर्यादी जलील खान अब्बास खान पठाण (५४ रा. भुईवाडा छत्रपती संभाजीनगर) यांचा खंडाळा येथे रॉयल कृषी सेवा केंद्र व मोबाईल शॉपी नावाने व्यवसाय आहे. आरोपी आशिक अली साहेब अली सय्यद (४० रा. शिऊर ता. वैजापूर) यांनी फिर्यादीकडून एकूण एक लाख बावीस हजार रुपयांची मोबाईल खरेदी केला होता. त्यापैकी फिर्यादीस एकवीस हजार रुपये रोख दिले व उर्वरीत रकमेसाठी २७ डिसेंबर २०१७ रोजीचा एक लाख एक हजार रुपयांचा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शिऊरचा धनादेश दिला होता. सदरचा धनादेश फिर्यादीने बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खंडाळा येथे जमा केला. परंतु अपुऱ्या रकमेअभावी सदरचा धनादेश वटला नाही.
हेही वाचा: परप्रांतीयांचे वाढले 'लोंढे', पोलिस प्रशासन बेखबर
फिर्यादीने आरोपीस भेटून धनादेश अनादरीत झाल्याबाबत कळविले असता आरोपीने धनादेश पुन्हा वटविण्यासाठी टाकण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने पुन्हा वटविण्यासाठी बँकेत जमा केला. परंतु धनादेश न वटता अनादरीत होऊन परत आला. फिर्यादीने वकीलामार्फत आरोपीस नोटीस पाठवून अनादरीत झालेल्या धनादेशाची रक्कम मुदतीत फिर्यादीस आणून देण्यास सांगितले होते. आरोपीने सदर नोटीसला उत्तर दिले. त्यात त्याने मोबाईल खरेदीचा व्यवहार मान्य केला नाही. तसेच फिर्यादीने धनादेश हा आरोपीच्या घरातून चोरून नेल्याचे नमूद केले.
हेही वाचा: सेवानिवृत्त ग्रेडरला लाखोंना गंडविले! शेअर बाजाराचे आमिष अंगलट
आरोपीचे वकील ॲड. एस. एस. ठोळे यांनी घेतलेल्या उलट तपास तसेच युक्तिवादातून मोबाईल विक्रीचा व्यवहार फिर्यादीचा मुलगा इम्रान आणि आरोपी यांच्यात झाल्याचे, आरोपीने मोबाईल विक्री करार इम्रानच्या नावाने करुन दिला आहे. तसेच इम्रानला प्रस्तुत धनादेश सुरक्षेपोटी दिल्याचा उल्लेख या करारनाम्यात केलेला आहे. अशा परिस्थितीत फिर्यादीला उर्वरीत रकमेपोटी धनादेश कसा दिला होता. याबाबत संशय निर्माण होतो. प्रकरण फिर्यादीने दाखल केले असून त्याच्याकडे हा धनादेश दाखल करण्यासाठी इम्रानने अधिकारपत्र किंवा त्यास योग्य प्रकारे प्राधिकृत व्यक्ती म्हणून नेमणूक केले असल्याचे दिसून येत नाही.
हेही वाचा: अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला संपवलं!
अयोग्य प्रकारे फिर्यादीचे सादरीकरण झालेले आहे. त्यामुळे फिर्यादी 'योग्य धारक' या सज्ञेमधे बसत नसल्याबाबत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने विक्रीचा व्यवहार फिर्यादीचा मुलगा इम्रान आणि आरोपी आशिक आली यांच्यात झाला असल्याने फिर्यादीस धनादेश का दिला ? दाखल केलेल्या मोबाईल बिलांच्या सत्यताबाबत, धनादेशावरील सही आरोपीची असल्याबद्दल देखील प्राबल्यतेच्या आधारावर संशय निर्माण होत असल्याने फिर्यादी आणि आरोपी यांच्यातील व्यवहार हा संशयास्पद असून योग्य नाही असे निरीक्षण नोंदविले.
प्रकरणातील फिर्याद, कायदेशिर देणे आणि चलनक्षम दस्तऐवज कायद्यानुसार आवश्यक बाबींची पूर्तता न केल्यामुळे आवश्यक घटकांची शाबिती झाली नसल्यामुळे आरोपीने गुन्हा केला असल्याचे सिद्ध झाले नाही. त्यामुळे आरोपी आशिक आली याची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. पिसाळ यांनी निर्दोष सुटका केली. आरोपी तर्फे ॲड. एस. एस. ठोळे आणि ॲड. आकाश ठोळे यांनी काम पाहिले.
0 Comments