शिऊर येथील खळबळजनक घटना
वैजापूर तहसीलदारांनी वाळूचे वाहन पकडून दंडात्मक कारवाई केल्याने नैराश्याच्या भरात एकाने शिऊर पोलिस ठाण्यातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना १० जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान घटनेनंतर रुग्णास वैजापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार करण्यात आले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
गणेश बाबासाहेब गडकर ( रा. उंदीरवाडी) असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी रोजी तहसीलदार सुनील सावंत यांनी तालुक्यातील भायगावगंगा येथे वाळूचे वाहन पकडून तेथील पोलिस पाटलांच्या हवाली केले. वाहन पकडल्यानंतर तहसीलदार सावंत यांनी गणेश गडकरला दंडाची नोटीस पाठवून दंड भरण्याचे सुचविण्यात आले. नोटीसीत नमूद केल्याप्रमाणे दोन ब्रास वाळूचा दंड भरावयास सांगण्यात आले.
परंतु तहसीलदारांनी नोटीसीत नमूद केल्याप्रमाणे माझ्या वाहनात दीडच ब्रास वाळू होती. त्यामुळे दोन ब्रासचा दंड का भरू? असे गडकरचे म्हणणे झाले. त्यामुळे गडकर याने नैराश्याच्या भरात शिऊर पोलिस ठाण्यात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. औषध प्राशन केल्यामुळे त्याच्या तोंडातून फेस आला. त्यामुळे पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. यानंतर शिऊर पोलिसांनी तेथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून त्याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान पोलिस ठाण्यात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गणेश गडकर याच्याविरुद्ध शिऊर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मी वाळूचे वाहन पकडून कारवाई केली. हे सत्य आहे. परंतु दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे मी दंडाची नोटीस देण्याचा प्रश्नच येत नाही.- सुनील सावंत, तहसीलदार, वैजापूर
तहसीलदारांनी वाहन पकडून दंडात्मक कारवाई केल्याने गणेश गडकर याने पोलिस ठाण्यातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.- विजय देशमुख, प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक, शिऊर
तहसीलदारांनी माझ्या भावाचे वाळूचे वाहन पकडून दोन ब्रास वाळूच्या दंडाची नोटीस बजावली. परंतु या वाहनात दीडच ब्रास वाळू होती. त्यामुळे दोन ब्रास वाळूचा दंड का भरायचा? या नैराश्याच्या भरात माझ्या भावाने विषारी औषध प्राशन केले.- महिपाल गडकर, ( भाऊ) रा. उंदीरवाडी