पालखेड येथील घटना
वैजापूर तालुक्यातील पालखेड शिवारात शेतवस्तीवर चोरट्यांनी धुमाकूळ घालत वृद्ध दांपत्यास जबर मारहाण करून ४० हजारांचा ऐवज लुटून नेल्याची घटना ०५ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर जखमी अवस्थेत दांपत्यास वैजापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम गंगाधर मोकाटे (६६ रा.मोकाटे वस्ती, पालखेड) व त्यांची पत्नी भामाबाई हे दोघेही बुधवारी रात्री नऊ वाजता नेहमीप्रमाणे जेवण आटोपून झोपी गेले. रात्री दीड वाजेच्या सुमारास तुकाराम मोकाटे यांना घराचा पाठीमागील दरवाजा वाजल्याचा आवाज कानी पडला. त्यामुळे त्यांना जाग आली व ते जोरजोराने 'चोर-चोर' ओरडत पुढच्या खोलीत आले. तोपर्यँत दरवाजाची कडी तोडून तिघा चोरट्यांनी घरात प्रवेश केला व तुकाराम यांच्या डोक्यात लोखंडी गजाने जबर मारहाण करून त्यांना जखमी केले. दरम्यान त्यांच्या पत्नी भामाबाई यांनी पुढच्या खोलीचा दरवाजा उघडला. दोघे पती-पत्नी घराबाहेर जात असताना चोरट्यांनी भामाबाई यांच्या देखील डोक्यात लोखंडी गजाने जबर मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाची (४० हजार रुपये) सोन्याची पोत हिसकावून घटनास्थळाहून धूम ठोकली. या घटनेत पती-पत्नी गंभीर जखमी झाले.
दरम्यान सुरू असलेला आरडाओरडा ऐकून वस्तीवरील अन्य शेजारील नागरिक या ठिकाणी जमा झाले. त्या सर्वांनी तुकाराम व भामाबाई यांना उपचारासाठी वैजापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, हवालदार रावसाहेब रावते यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील नरवडे करीत आहेत.