Vaijapur Assembly Election 2024 | १४ व्या 'आमदारकी'ची माळ कुणाच्या गळ्यात.? 'ह्यांना' मिळाली सर्वाधिक संधी अन् 'ते' ठरले 'विक्रमादित्य'

0

वैजापूरने आतापर्यंत दिले १३ आमदार


काॅंग्रेस खालोखाल शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघाने आतापर्यंत १३ आमदार निवडून दिले आहेत. मतदारसंघाच्या पहिल्या आमदार होण्याचा मान एका महिलेने मिळविला आहे. सेनेचे माजी आमदार स्व. आर.एम.वाणी यांनी सर्वाधिक काळ म्हणजे आमदारकीची हॅटट्रिक साधून १५ वर्षे प्रतिनिधीत्व केले होते तर त्याखालोखाल काँग्रेसचे रामकृष्णबाबा पाटील यांनी सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत आमदारकी मिळविली. कै. गंगाधरनाना  पवार ( टेंभीकर ) यांना सर्वात कमी काळ आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. याशिवाय मतदारसंघात तीन महिलांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी सर्वाधिक मताधिक्य घेऊन 'विक्रमादित्य' होण्याचा मान मिळवला आहे. दरम्यान १४ व्या आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याबाबत मतदारांना उत्सुकता लागून आहे.

 
 

 सन १९५२ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीत वैजापूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्या आमदार होण्याचा मान कै. आशाताई वाघमारे यांना मिळाला. त्यांनी सन १९५२ ते  १९५७ पर्यंत मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीचे अॅड. मच्छिंद्रनाथ जाधव यांना आमदार होण्याची संधी मिळाली. त्यांनी १९५७ ते  १९६३ पर्यंत सत्ता गाजविली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर  झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार मच्छिंद्रनाथ जाधव यांच्या सहचारिणी गिरजाबाई जाधव या काँग्रेस पक्षाच्या आमदार झाल्या. 


त्यांच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीनंतर १९६७ मध्ये काँग्रेसचे कै. विनायकराव पाटील यांनी  आमदारकीची धुरा सांभाळली. त्यांना आमदार म्हणून अवघा दोन वर्षांचा कार्यकाळ मिळाला. त्यांनी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच सहकारमंत्री पदही भूषविले. सन १९६९ मध्ये त्यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचेच कै. गंगाधरनाना पवार विजयी झाले. त्यांच्यानंतर कै. विनायकराव पाटील यांच्या पत्नी शकुंतलाबाई पाटील यांनी पाच वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. सन १९७७  ते १९८० या काळात समाजवादी पक्षाचे अॅड. उत्तमराव पटवारी मतदारसंघाचे आमदार राहिले. 


'खासदारकी'ची संधी फक्त 'बाबां'ना

त्यानंतर श्रीरापूरचे गोविंदराव आदिक यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर विधानसभेची निवडणूक जिंकून सन १९८१ ते १९८५ हा पाच वर्षांचा आमदारकीचा कार्यकाळ भूषविला. सन १९८५ ते १९९५  अशा सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस व एस.  काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवून रामकृष्णबाबा पाटील यांनी आमदारकी मिळविली. याशिवाय सन १९९९ मध्ये  ते केवळ १३  महिने जिल्ह्याचे खासदार राहिले.  सन १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे स्व. कैलास पाटील चिकटगावकर  मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी झाले.


आर. एम. वाणींना सर्वाधिक संधी 

 त्यांच्यानंतर म्हणजेच १९९९ सालानंतर मतदारसंघात काँग्रेसला उतरती कळा लागायला सुरवात झाली. १९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेचे माजी आमदार आर.एम.वाणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चिकटगावकर यांचा पराभव करून सत्ता काबीज केली. आमदारकीची हॅटट्रिक साधून वाणी यांनी सन १९९९ ते २०१४ पर्यंत अशी तब्बल १५ वर्षे सत्ता गाजविली. आमदारकीची हॅटट्रिक साधणारे मतदारसंघातील ते पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले. 


रमेश बोरनारे ठरले 'विक्रमादित्य'

सन २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी वाणी यांची विजयी श्रृंखला खंडित करून विधानसभेत प्रवेश केला. सन २०१९ मध्ये शिवसेनेचेच रमेश बोरनारे विक्रमी मतांनी विजयी होऊन ते 'विक्रमादित्य' ठरले होते. त्यांनी या निवडणुकीत ९७ हजार ६२५ मते मिळाली होती तर ५८ हजार ८१८ त्यांचे मताधिक्य होते. त्यांना पडलेली मते व त्यांचे मताधिक्य पाहता ही किमया आतापर्यंत कुणालाच साधता आली नाही.मतदारसंघाचा इतिहास पाहता आतापर्यंत मतदारांनी अपक्ष उमेदवारास थारा दिला नाही. आतापर्यंत म्हणजेच गेल्या ६७ वर्षांत मतदारसंघात १३ आमदार झाले. १४ व्या आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार. याबाबतची उत्सुकता मतदारांमध्ये शिगेला पोहोचली आहे. 


    तिघींनी केले मतदारसंघाचे नेतृत्व 

वैजापूर विधानसभा मतदारसंघात कै. आशाताई वाघमारे, गिरजाबाई जाधव  व शकुंतलाबाई पाटील या तीन महिलांनी नेतृत्व केले. त्यानंतर एकही महिला विधानसभेवर गेली नाही.


विधान परिषदेवर एकच 

विधान परिषेदेवर जाण्याचा मान तालुक्यातील पारळा येथील कै. पंढरीनाथ पाटील यांना मिळाला होता. त्यानंतर ही संधी कुणालाच मिळाली नाही.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top