८४ हजार महिला लाभार्थी
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' सुरू करून राज्यातील 'बहिणीं'चे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख ५३ हजार २७ महिला मतदार आहेत. यात ८४ हजार १३९ लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींचा कौल कुणाला? हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत कितीही उमेदवार असले तरी खरी लढत दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांतच होणार आहे. त्यामुळे बहिणी मतदानरुपी मायेची 'उब' कोणत्या राजकीय पक्षाच्य उमेदवाराला देतात? हाही औत्सुक्याचा विषय आहे.
राज्य सरकारने जूलै महिन्यापासून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला लाभार्थींना १५ ०० रुपये दिले जातात. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ही योजना सुरू करण्यात आली. गेल्या काही वर्षांतील इतिहास पाहता शासनाची ही योजना लोकप्रिय आणि तितकीच यशस्वी ठरली. या योजनेच्या माध्यमातून वैजापूर तालुक्यातील ८४ हजार १३९ महिलांना लाभ होतोय. राज्यातील विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
वैजापूर विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख १८ हजार ६७२ मतदार असून यामध्ये एक लाख ५३ हजार २७ स्त्री मतदार आहेत. दरम्यान वैजापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल १० उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत ही लढत शिंदेसेना व महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार रमेश बोरनारे व ठाकरेसेना व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी या तुल्यबळ उमेदवारांमध्येच होणार आहे. दोघांचीही राजकीय कारकीर्द समकालीन व दीर्घ काळाची आहे. बोरनारे यांनी सरपंच , जिल्हा परिषद सदस्य व आमदार म्हणून तर डॉ. परदेशींनी नगरपालिकेवर सदस्य व नगराध्यक्ष म्हणून दीर्घकाळ सत्ता गाजविलेली आहे. दरम्यान या योजनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील असंख्य बहिणींचे 'लाडके' ठरून योजनाही तितकीच लोकप्रिय ठरली. हे तर विरोधकांनाही मान्य करावे लागेल. एवढेच नव्हे तर बहिणींच्या खात्यावर रक्कम पडून त्यांची दिवाळीही 'गोड' करण्याचा प्रयत्न केला. ८४ हजार १३९ बहिणींच्या अर्जांना मान्यता मिळाली तर काही बहिणी अजूनही प्रतिक्षेत आहेत.
अशा परिस्थितीत तालुक्यातील लाडक्या बहिणी मतांचा कौल कुणाला देतात? याचा फैसला निवडणुकीतच होणार आहे. शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली खरी. परंतु मतरुपी ही 'मायेची' उब कुणाला किफायतशीर ठरणार? यासाठी काही दिवस अजून 'वेट अॅंड वाॅच' करावे लागणार आहे.