मतदारसंघात आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी
वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार जिवाचे रान करीत हायटेक प्रचार यंत्रणा राबवित आहेत. आरोप - प्रत्यारोपांच्या फैरीमुळे मतदारसंघात धुरळा उडाला आहे. निवडणूक प्रचारात सर्वच उमेदवारांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने शेवटच्या टप्प्यात निवडणुकीत रंग भरला गेला. मतदारसंघात शिवसेना विरूद्ध शिवसेना अशीच दुरंगी लढत होणार असून या दोन्हीही पक्षांच्या उमेदवारांनी एकमेकांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे ही निवडणूक आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे.
गेल्या महिनाभरपासून विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारादरम्यान सर्वच उमेदवारांनी एकमेकांवर राळ उठविली आहे. शिवसेना महायुतीचे विद्यमान आमदार रमेश बोरनारे, उबाठा शिवसेना महाविकास आघाडीचे डॉ. दिनेश परदेशी, भाजपचे बंडखोर एकनाथ जाधव, प्रहार जनशक्ती पक्षाचे जगन्नाथ जाधव, वंचित बहुजन आघाडीचे किशोर जेजुरकर, अपक्ष ज्ञानेश्वर घोडके आदी एकूण १० उमेदवार निवडणूक आखाड्यात शड्डू ठोकून उतरले आहेत. शेवटच्या टप्प्यात सर्वच उमेदवारांनी जिवाचे रान करीत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवारांना आपल्या विजयाची खात्री आहे. निवडणुकीत बहुतांश उमेदवार नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा राबवित आहे. शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत आहे. त्यामुळे उबाठा महाविकास आघाडीचे डॉ. परदेशींनी त्यांना रोखण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त सुरू केली आहे.
परंतु दुसरीकडे आमदार बोरनारेंनीही हा गड अभेद्य ठेवण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढीत प्रतिष्ठा पणाला लावली आहे. बोरनारेंकडे ठाकरेसेनतून बाहेर पडलेले माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, बाबासाहेब जगताप, संजय निकम, अभय पाटील चिकटगावकर, डॉ. राजीव डोंगरे व दुसऱ्या फळीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आहे तर डाॅ. परदेंशींनाही काॅंग्रेस नेते भाऊसाहेब ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पंकज ठोंबरे, अकिल शेख व कार्यकर्त्यांची साथ आहे. निवडणुकीसाठी अवघ्या ६ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात काॅर्नर सभा, प्रचार फेऱ्यांवर उमेदवारांचा जोर वाढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेचा अपवाद वगळता मतदारसंघात अन्य मोठ्या नेत्यांची सभा झाली नाही.
प्रचारबाजी , चिखलफेक व आरोप - प्रत्यारोपांच्या फैरीमुळे उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात चांगलीच रंगत आणल्याने निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. या दोन्हीही उमेदवारांनी निवडणूक प्रचार ताकदीने केल्याने अन्य उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. परंतु असे असले वैजापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण? याचा फैसला मतदार करणार आहेत.दरम्यान शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाला घायाळ करणार? मशाल किती धगधणार ? प्रेशर कुकरची शिट्टी किती वाजणार? याचा फैसला मात्र २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
'नेटवाॅर' भडकले
प्रचारासाठी उमेदवार आपल्या अनुयायांमार्फत सोशल नेटवर्किंग साइटचा सहारा घेतांना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदेसेना व उबाठा शिवसेना उमेदवारांमध्ये नेटवाॅर भडकले आहे. सोशल मीडियावर एकमेकांविरुद्ध राळ उठवून मीच कसा योग्य आहे. हे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन चिखलफेक होत असल्यामुळे राजकारणाची नीतीमूल्य गुंडाळून ठेवल्याचे मतदारांना दिसत आहे. निवडणुकीच्या मुद्द्यांवर धनुष्यातून 'शब्द'बाण तर मशालही चांगलीच 'पेटली' आहे.