डॉ. परदेशींंसह कार्यकर्त्यांचा फुटला बांध
वैजापूर विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यांना पचनी पडायला तयार नाही. शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचा निवडणुकीत विजय होऊन ठाकरसेनेचे डॉ. दिनेश परदेशींचा झालेला पराभव त्यांच्यासह कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांनी डॉ. परदेशींची भेट घेऊन झालेला पराभव अनावर झाल्याने कार्यकर्त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी डॉ. परदेशींनाही आपल्या भावनांना आवर घालणे कठीण झाले अन् त्यांच्याही अश्रुंचा बांध फुटला. त्यामुळे वातावरण चांगलेच गंभीर झाले.
वैजापूर विधानसभा निवडणूकीत शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे व ठाकरेसेनेचे डॉ. दिनेश परदेशी या दोन तगड्या प्रमुख उमेदवारांसह १० उमेदवार उभे होते. बोरनारे व परदेशी या दोघांत 'घमासान' होईल. असे वाटत असतानाच निवडणूक निकालानंतर राजकीय पंडितांचे अंदाज मोडीत निघून ते तोंडघशी पडले. एवढेच नव्हे तर ठाकरेसेनेच्या उमेदवार परदेशी व कार्यकर्त्यांनाही चांगलाच धक्का बसला. त्यांच्यासाठी हा निकाल अनपेक्षित होता.
एवढा फरकाने परदेशींचा पराभव होईल. असे कुणीच गृहित धरले नव्हते. त्यामुळे हा पराभव परदेशींसह ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यांना चांगला जिव्हारी लागला. निवडणुकीनंतर डॉ. दिनेश परदेशी यांच्या शहरातील गंगापूर रस्त्यावरील साईपार्कमधील संपर्क कार्यालयात कार्यकर्ते चिंतन बैठकीसाठी जमल्यानंतर त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले. सर्वच कार्यकर्त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला अन् वातावरण धीरगंभीर झाले.
कार्यकर्त्यांचा फुटलेला बांध पाहून डॉ. परदेशींनाही अश्रू अनावर झाले अन् त्यांनीही भावनांना वाट मोकळी करून दिली. परंतु याही परिस्थितीत डॉ. परदेशींनी स्वतःबरोबरच कार्यकर्त्यांनाही सावरून उभारी देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान डॉ. परदेशींच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांचा फुटलेला बांध, अतिशय भावनाशील, संवेदनशील वातावरण पाहता याही परिस्थितीत डॉ. परदेशींनी जनसेवेसाठी दाखविलेली तत्परता कार्यकर्त्यांची मने जिंकून गेली.
जनसेवेसाठी पुन्हा कटिबद्ध
डॉ. परदेशी म्हणाले की, समस्या घेऊन जवळपास सर्वच माझ्याकडे यायचे. मग निवडणुकीत असे अचानक काय झाले की मला मतं कमी पडली? असा प्रश्न उपस्थित करून झाले - गेले विसरून जा. निवडणुकीत जय - पराजय चालूच असतो. त्यामुळे खचून जायचे नाही. येणाऱ्या निवडणुका तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्याच आहे. कुणाशी वाद घालू नका, वाकडं तिकडं बोलू नका. माझा पराभव झाला असला तरीही मी तुमच्यासह जनसेवेत पुन्हा सदैव तत्पर आहे. त्यामुळे पराभवाची धग विसरून पुन्हा जोमाने कामाला लागा. असे आवाहन डॉ. परदेशींनी केले.