Samruddhi Highway | अस्थी विसर्जनासाठी जाताना काळाचा घाला; सासरे - जावई जागीच ठार

0

आयशरची कारला धडक; 'समृद्धी'वरील घटना 


भरधाव आयशरने कारला दिलेल्या जोरदार धडक झालेल्या अपघातात अस्थी विसर्जनासाठी नाशिक येथे जात असलेल्या  सासरे व जावई जागीच ठार तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील ( Nagpur - Mumbai Samruddhi Highway) चॅनल क्रमांक ४९० लगत वैजापूर ( Vaijapur) तालुक्यातील सुराळा शिवारात घडली. 

रामचंद चंदुमल मेठानी (५५ रा. रामपुरी केम, झुलेलाल लाईन,  नियर काकीमों आश्रम अमरावती) व नामदेव ढालुम पोपटाणी (३८ रा. जुनासिंधी कॉलनी,  ब्लाक क्रं-ए-३ नंदुरबार) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची तर रमण टेकवानी व दीपक मेठानी अशी जखमींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद मेठानी हे अमरावती येथील रहिवासी होती.  १२ दिवसांपूर्वी त्यांच्या भावजयीचे निधन झाले. यामुळे रामचंद व त्यांचे जावई नामदेव, पुतणे रमण व दीपक यांच्यासोबत एका कारने नाशिक येथे अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांची कार समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक ४९० जवळ पोहोचली. 


यावेळी समोरून चुकीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव आयशरने (डी. डी.०१-एन-९२७५) त्यांच्या कारला जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, रामचंद व  नामदेव हे जागीच ठार झाले तर त्यांचे पुतणे गंभीर जखमी झाले. घटना घडताच जखमींना उपचारासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून रामचंद व नामदेव यांना मृत घोषित केले. त्यांच्या पुतण्यांना पुढील उपचारासाठी छञपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी  रामचंद यांचा मुलगा जयकुमार मेठानी याने दिलेल्या फिर्यादीवरून आयशर चालकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top