'लाडक्या बहिणीं'ची मायेची 'उब' कुणाला?
यंदाच्या वैजापूर विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीने उच्चांक गाठला असून निवडणुकींच्या इतिहासात प्रथमच एवढ्या प्रमाणावर मतदार मतदानासाठी सरसावले. मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण ७५.९४ टक्के मतदान झाले. यामध्ये ७४.१४ टक्के स्त्रियांनी तर ७७.६० पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकंदरीतच स्त्रियांच्या मतदानाचा टक्का पाहता 'लाडक्या बहिणीं'नी मतदानरुपी मायेची 'उब' भावाला दिली असे म्हणता येईल. परंतु असे असले तरी हा कौल कोणत्या भावाच्या पारड्यात पडला.? हे सांगणें अवघड आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ७५.९४ टक्के मतदारांनी मतदान करून इतिहास घडविला. यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख २० हजार ५०२ मतदार असून यामध्ये १ लाख ५४ हजार ०१५ स्त्री तर १ लाख ६६ हजार ४८७ पुरुष मतदार आहेत. यात अनुक्रमे १ लाख १४ हजार १९२ स्त्री तर १ लाख २९ हजार १८७ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्याचा टक्केवारी ७४.१४ आहे तर पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्याचा टक्केवारी ७७.६० आहे. मतदारसंघात पुरुष मतदारांच्या तुलनेत स्त्री मतदार कमी आहेत. म्हणजेच पुरुषांच्या तुलनेत १२ हजार ४७२ स्त्री मतदार कमी आहेत. असे असतानाही ताई - बाई - अक्कांनी मतदानयंत्रांचे बटन दाबून मतदानाचा टक्का वाढविण्यात त्या अग्रेसर राहिल्या.
मतदारसंघात एकूण २ लाख ४३ हजार ३७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच ७५.९६ टक्के मतदान झाले. यामध्ये ग्रामीण भागातील २ लाख १५ हजार ५४८ मतदारांचा समावेश आहे. म्हणजेच ग्रामीण भागात ७७.३३ टक्के मतदान झाले. दरम्यान मतदारसंघात १ लाख ५४ हजार ०२५ पैकी तालुक्यात ८४ हजार लाडक्या बहिणी आहेत. स्त्री मतदारांचे झालेले मतदान पाहता 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'ने साधलेली ही किमया नक्कीच म्हणता येईल. परंतु बहिणींचा कौल कुणाला? याचा फैसला मात्र २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
शहरात टक्का घसरला
वास्तविक पाहता शहरात ४१ हजार ७६९ मतदार आहेत. परंतु मतदानाचा झालेला टक्का पाहता कमी आहे. शहरात केवळ २७ हजार ८३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.म्हणजेच ६६.६३ टक्के मतदान झाले. ग्रामीण भागापेक्षा शहरात विक्रमी मतदान होईल. असे आडाखे बांधले होते. परंतु तसे झाले नाही.
गड्या आपला गावच बरा.!
मतदारसंघातील शहरात ६६.६३ टक्के तर ग्रामीण भागात ७७.३३ टक्के मतदान झाले. शहरातील नागरिकांचा ग्रामीण भागातील नागरिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही वेगळा आहे. परंतु झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून कोण सजग आहे अन् कोण जागरूक आहे? हे येथे अधोरेखित करण्याची गरज नक्कीच नाही. त्यामुळे शहरांपेक्षा आपला गावच बरा. असे खेदाने म्हणावे लागते.
शहरातही स्त्री मतदार पुरुषांच्या बरोबरीने
वैजापूर शहरात एकूण ४१ हजार ७६९ मतदार आहेत. यामध्ये २० हजार ७१४ पुरुष तर २० हजार ९५४ स्त्री मतदार आहेत. यापैकी १३ हजार ८६० पुरुष व १३ हजार ३७१ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. टक्केवारीत सांगायचे झाले तर पुरुषांचे प्रमाण ६६.९१ टक्के तर स्त्रियांचे प्रमाण ६३.८१ टक्के आहे. शहरातही स्त्री मतदारांनी पुरुष मतदारांच्या बरोबरीने मतदान केले. असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.
ग्रामीण भागातील स्त्रियाही अग्रेसरच
ग्रामीण भागात एकूण १ लाख ३३ हजार ०६१ स्त्री मतदार आहेत. यापैकी ९९ हजार २३८ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच ७४.५८ टक्के मतदान झाले. तसेच शहरातील २० हजार ९५४ स्त्रियांपैकी १३ हजार ३७१ स्त्रियांनी म्हणजेच ६३.८१ टक्के मतदानाचा हक्क बजावला. इथेही शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील स्त्रिया मतदान करण्यासाठी अग्रेसर ठरल्या आहेत.
छाया स्त्रोत - गुगल