Vaijapur Assembly Election Analysis 2024 | नेत्यांसाठी मतदानाची आकडेवारी 'धक्कादायक'; गावपुढारीही पडले 'तोंडघशी', आमदारांची सर्वच जि. प. गटांत 'बाजी'

0

 उमेदवारांना होमपीचवरच 'धोबीपछाड' 


नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना अर्थात शिंदेसेना व महायुतीच्या उमेदवाराने सर्वाधिक मते मिळविली तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराने दुसर्‍या क्रमांकाची मते घेतली. शिवसेनेच्या उमेदवाराने सर्वाधिक मताधिक्य घेतल्याने  वैजापूर तालुक्यातील विविध गटांतील कार्यकर्त्यांचा वरचष्मा राहिला. विधानसभा मतदारसंघातील गट व गावनिहाय मतदानाची आकडेवारी पाहता स्थानिक काही मातब्बर नेत्यांसाठी धक्कादायक ठरली आहे. स्वपक्षीय उमेदवारांना मताधिक्य मिळवून देण्यास नेते, कार्यकर्त्यांना सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे या नेते , कार्यकर्त्यांचे गावात किती 'वजन' याचे पितळही यानिमित्ताने उघडे पडले आहे. 


विधानसभा निवडणुकीत वैजापूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची गावांतील केंद्रनिहाय आकडेवारी हाती आली आहे. ही आकडेवारी पाहता काही स्थानिक राजकीय कार्यकर्ते  व नेत्यांसाठी धक्कादायक तर काहींसाठी दिलासादायक ठरली आहे. नेतेमंडळी राजकारणात मोठ्या ऐटीत वावरत असले तरी त्यांच्या मूळ गावातील मतदारांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या पदरात कौल टाकण्याऐवजी विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या पदरात कौल टाकून नेत्यांना चांगलीच चपराक दिली आहे.


 ठाकरेसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचे मूळ गाव असलेल्या चिकटगावमध्ये महायुतीच्या रमेश बोरनारेंना मताधिक्य मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. तेथे त्यांना ७२२ मतांचे मताधिक्य मिळाले. डॉ. परदेशींना केवळ १९४ मते मिळाली. माजी खासदार स्व . रामकृष्णबाबा पाटील व अप्पासाहेब पाटील यांच्या दहेगावमध्ये डॉ . परदेशींना १३२ मतांचे मताधिक्य आहे. काँग्रेस नेते भाऊसाहेब ठोंबरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार)  पंकज ठोंबरे यांच्या मूळ पुरणगावात बोरनारेंना ३७९ मतांचे मताधिक्य मिळाले. वास्तविक पाहता हे दोघेही डॉ. परदेशींसोबत होते. त्यामुळे त्यांना मताधिक्य मिळणे अपेक्षित होते. 


उध्दव सेनेला रामराम ठोकून ऐन निवडणुकीत बोरनारेंच्या तंबूत दाखल झालेले संजय निकम यांच्या टुणकी गावातही बोरनारेंना सर्वाधिक ५९४ मते तर डॉ. परदेशींना केवळ २२७ दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. बोरनारेंनी ३६७ मतांनी आघाडी घेतली. तालुक्यातील शिऊर गावात बोरनारेंना २७८२, डॉ. परदेशींना २१९५ मते मिळाली. भाजपचे बंडखोर एकनाथ जाधव व जगन्नाथ जाधव यांच्या 'होमपीच' असलेल्या शिऊर गावामध्ये मतदारांनी 'धोबीपछाड' देत त्यांना अनुक्रमे ९६४ व १०५ मते मिळाली. येथेही बोरनारेंनी धुवांधार 'बॅटिंग' केली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप यांच्या भऊरमध्ये बोरनारेंना सर्वाधिक मते असून ३०९ मतांची आघाडी आहे. आमदार रमेश बोरनारे यांच्या होम ग्राऊंड असलेल्या चिंचडगावमध्ये त्यांना ४७८ व डॉ. परदेशींना १४५ मते मिळाली असून बोरनारेंना ३३३ मतांची आघाडी आहे. 


उबाठा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे यांच्या महालगावातही नाकावर टिच्चून बोरनारेंनी १२९८ मते घेत ६९ मतांची आघाडी घेतली. डॉ. परदेशींनीही जवळपास बरोबरीने १२२९ मते घेतली. तालुक्यातील पालखेड येथे बोरनारेंना १९२६ तर डॉ. परदेशींना ८६४ मते मिळाली असून १०६२ मतांनी बोरनारेंनी आघाडी घेतली. तालुक्यातील धोंदलगावातून बोरनारेंना १६७९ व डॉ. परदेशींना १२४५ मते मिळाली. भाजपचे उपजिल्हाप्रमुख कल्याण दांगोडे यांच्या करंजगावात बोरनारेंना ५३५ व डॉ. परदेशींना ४२९ मते मिळाली आहेत. 


बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव यांच्या भटाण्यात बोरनारेंना केवळ ६७ मतांची आघाडी आहे. त्यामानाने दोन्हीही उमेदवारांना पडलेल्या मतांमध्ये फारसा फरक नाही. जाधवांपेक्षाही बाजार समितीचे माजी सभापती भागिनाथ मगर हे त्यांना 'भारी' पडले. मगर यांनी बोरनारेंना ३५८ मतांची आघाडी मिळवून दिली. जाधव व मगर दोघेही एकमेकांचे व्याही असून यात तलवाड्याचे व्याही वरचढ ठरले आहेत. तालुक्यातील खंडाळ्यात डॉ. परदेशींनी सर्वाधिक ३४५४ मते घेतली असून बोरनारेंना दुसऱ्या क्रमांकाची २००४ मते घेतली. परदेशींनी १४५० मते अधिक घेतली. माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत यांच्या आघूरमध्ये बोरनारेंना १२११ व डॉ. परदेशींना ६५९ मते मिळाली. येथेही बोरनारेंना  ५५२ मतांनी आघाडी मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. 


 बोरनारेंची पकड कायम 

दरम्यान वैजापूर शहरासह काही गावांचा अपवाद वगळता डॉ. परदेशींनी मतांची आघाडी घेण्यात बाजी मारली तर तालुक्यातील वाकला, बोरसर, शिऊर, सवंदगाव, लासूरगाव, महालगाव, वांजरगाव, घायगाव या गटांसह गंगापूर तालुक्यातील ५३ गावांमध्ये रमेश बोरनारे यांनीच मताधिक्य घेत आपली पकड कायम ठेवली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top