दोन कोटी रुपयांची हेराफेरी
वैजापूर शहरालगतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमधील एका अडत व्यापाऱ्याने तालुक्यातील ४०० शेतकऱ्यांचे दोन कोटी पाच ७५ हजार रुपयांचा कांदा खरेदी करून त्यांना रक्कम न देता धूम ठोकली आहे. दरम्यान आम्ही विक्री केलेल्या कांद्याची रक्कम आम्हाला द्या. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीसह सचिवास घेराव घालून आवारात घोषणाबाजीसह ठिय्या देऊन 'राडा' केला. या घटनेमुळे बाजार समिती प्रशासनास पोलिसांना पाचारण करण्याची नामुष्की ओढवली. विशेष म्हणजे यातील बहुतांश शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने दिलेले धनादेश न वाटल्याने शेतकरी संतापले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही महिन्यांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात चांगलाच घोळ सुरु आहे. शेतकऱ्यांनी कांदा विक्री करूनही त्यांना रोख रक्कम न देता अडत व्यपारी धनादेश देत आहे. परंतु बॅंकेत धनादेश जमा केल्यानंतर व्यपाऱ्याच्या खात्यावर रक्कम नसल्याने ते वटत नसल्याच्या तक्रारी आहेत. आश्चर्य म्हणजे कांदा मार्केटमधील साई बालाजी ट्रेडिंग कंपनीचे अडत व्यापारी सागर राजपूत यांच्याकडे दीड महिन्यापूर्वी वैजापूर तालुक्यातील ४०६ शेतकऱ्यांनी तब्बल दोन कोटी ५ लाख ७५ हजार ४९७ रूपयांचे कांदे विक्री केले होते.
विक्री केलेल्या कांद्याच्या रकमेपोटी यातील काही शेतकऱ्यांना पुढील तारखेंचे धनादेश देण्यात आले होते. परंतु त्या - त्या तारखेचे धनादेश शेतकऱ्यांनी बॅंकेत वटविण्यासाठी टाकले असता सागर राजपूत यांच्या बॅंक खात्यावर रक्कमच नसल्याचे बॅंक व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना सांगितल्यामुळे त्यांना माघारी परतण्याची नामुष्की ओढवली. अडत व्यापाऱ्याची ही 'हेराफेरी' लक्षात आल्यानंतर दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटला टाळे ठोकले होते. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने मध्यस्थी करीत शेतकऱ्यांना पुढील वायदा देण्यात आला होता. परंतु दीड महिन्याचा कालावधी उलटूनही अडत व्यापारी राजपूत यांनी शेतकऱ्यांची रक्कम न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी २५ नोव्हेंबर रोजी पुन्हा बाजार समिती गाठून सभापतींसह सचिवांना घेराव घातला.
यामुळे बाजार समितीमध्ये एकच गोंधळ उडाला. परिणामी पोलिसांना पाचारण करून शेतकऱ्यांना आवरावे लागले. परंतु असे असले तरी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत बाजार समितीच्या आवारात ठिय्या देऊन बाजार समितीच्या सभापतींसह गलथान कारभाराच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केली. बहुतांश शेतकऱ्यांनी धनादेश न घेता केवळ विश्वासावर व्यापाऱ्याला कांदा विक्री केलेला आहे. त्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार की डुबणार? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
काय आहे नियम?
बाजार समितीच्या कांदा बाजारात माल विकल्यानंतर २४ तासांच्या आत शेतकऱ्यांना विकलेल्या मालाचे पैसे देणे बंधनकारक असल्याचा नियम आहे. तसा सूचना फलकही बाजाराच्या प्रवेशद्वारावर लावलेला आहे.परंतु या नियमाला येथील काही व्यापाऱ्यांनी बाजाराच्या भिंतीपुरतेच मर्यादित ठेवून हरताळ फासला आहे.
पदाधिकारी काय करतात?
पैशांसाठी शेतकऱ्यांना महिनोन्महिने ताटकळत ठेवून अडत व्यापारी मनमानी कारभार करीत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी मात्र मुग गिळून गप्प आहेत. शेतकऱ्यांना रक्कम मिळत नसेल तर यासाठी बाजार समितीही तितकीच कारणीभूत आहे. ढिसाळ व नियोजनशून्य कारभाराची नाहक शिक्षा शेतकऱ्यांना मिळत आहे.