१ लाख ३३ हजार ६२७ घेतली मते
वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या अतिशय रोमहर्षक झालेल्या निवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे (MLA Ramesh Bornare)यांनी 'विक्रमी' विजय मिळवला. त्यांनी उबाठा शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी (Dr Dinesh Pardeshi)यांचा ४१ हजार ६५८ मतांनी पराभव केला. बोरनारे यांना १ लाख ३३ हजार ६२७ तर डॉ. परदेशींना ९१ हजार ९६९ मते मिळाली. याशिवाय जाधव बंधूंसह अन्य उमेदवारांचा या निवडणुकीत अक्षरश: 'खुर्दा' झाला. दरम्यान सुरवातीला चुरशीची वाटणारी ही निवडणूक मात्र एकतर्फी झाली. डॉ . परदेशींना पहिल्यापासून ते शेवटपर्यंत मताधिक्य मिळविता आले नाही. विशेष म्हणजे शहरातील मतदार डाॅ. परदेशींना 'हातभार' लावतील. असे वाटत असतानाच मतदारांनी आमदार बोरनारेंना पाठबळ दिल्याचे पहावयास मिळाले. एवढेच नव्हे तर ग्रामीण मतदारही त्यांच्या पाठीशी राहिल्याने त्यांना आपली आमदारकी 'शाबूत' ठेवता आली.
वैजापूर विधानसभा निवडणुकीत साम, दाम, दंड व भेद नीतीचा सुरवातीपासूनच अवलंब केला. शिवसेना महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे व उबाठा शिवसेना महाविकास आघाडीचे डॉ. दिनेश परदेशी या दोन्हीही उमेदवारांचा 'आवाका' मोठा असल्याने मतदारसंघात मोठा धुरळा उडाला. विशेष म्हणजे 'अर्थ'शास्त्राची किमया मोठ्या प्रमाणावर चालली. कुणीच हयगय केली नाही. प्रचाराची धामधूम सुरू असताना ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होईल. असे वाटत असतानाच निवडणूक निकालानंतर हे सर्व अंदाज 'फोल' ठरले.
महायुतीचे रमेश बोरनारे हे सुरवातीपासूनच मताधिक्य घेण्यात आघाडीवर राहिले. त्यांनी डॉ. परदेशींना शेवटपर्यंत आघाडी घेण्यापासून रोखून ठेवले. तालुक्यातील डोंगरथडी भागाची मतमोजणी संपून शहरातील मतांची मोजणी सुरू झाल्यानंतर आतातरी डॉ. परदेशींची 'मशाल' पेटेल असे कार्यकर्त्यांना वाटत असतानाच तेथेही बोरनारेंनी मुसंडी मारली. शहरातील मतमोजणी आटोपल्यानंतर कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने 'धीर' सोडून दिला. १२ व्या फेरीपर्यंत बोरनारेंनी जवळपास २२ हजारांचे मताधिक्य घेतले होते. २० व्या फेरीपर्यंत हे मताधिक्य घटेल. अशी अपेक्षा महाविकास आघाडीच्या उमेदवारासह कार्यकर्त्यांनी परंतु हे अंदाज मोडीत निघाले अन् बोरनारेंची विजयाकडे घौडदौड चालूच राहिली.
शेवटी त्यांनी ४१ हजार ६५८ मताधिक्य घेत डॉ. परदेशींचा पराभव करून आपली विजयी श्रृंखला कायय ठेवली. दरम्यान वैजापूर विधानसभा निवडणूक आखाड्यात एकूण १० उमेदवार होते. मतदारसंघातील ३ लाख २० हजार ५०२ मतदारांपैकी २ लाख ४३ हजार ३७९ मतदारांनी मताचा हक्क बजावला होता. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता शहरालगतच्या विनायकराव पाटील महाविद्यालयात निवडणूक एकूण २० टेबलवर मतमोजणी करण्यात आली.
नकारार्थी (नोटा ) मतदान - १७२३ मते
अवैध मते - ९३
स्वतःचाच विक्रम काढला मोडीत
सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार रमेश बोरनारे यांना ९७ हजार ६२५ मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी १ लाख ३३ हजार ६२७ मते मिळून त्यांचा मागील निवडणुकीतील 'विक्रम' मोडीत काढला. आताही वैजापूर विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात सर्वाधिक मतें घेऊन निवडून येणारे ते पहिले आमदार ठरले आहेत.
डॉ. परदेशींच्या पराभवाची हॅट्ट्रिक
दरम्यान महाविकास आघाडीचे डॉ. दिनेश परदेशींनी आतापर्यंत सन २००९, २०१४ व २०२४ अशी तीनवेळा विधानसभा निवडणूक लढविली. परंतु तिन्हीही वेळा ते पराभूत झाले. त्यामुळे त्यांची पराभवाची 'हॅट्ट्रिक' झाली आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
दरम्यान, निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर आमदार रमेश बोरनारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजीसह गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.