Sub-District Hospital | 'ती' प्रसूत झाली.. गोंडस बाळाला जन्मही दिला.. परंतु पुढं घडलं ते भयंकर.!

0

 हलगर्जीपणामुळे बळी गेल्याचा आरोप 


 तिला प्रसवकळा सुरू झाल्या.. ग्रामीण भागातील असल्यामुळे कशीबशी तिला शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.. तिने गोंडस बाळाला जन्मही दिला..परंतु ती अत्यवस्थ झाली.. नेहमीप्रमाणे डाॅक्टरांनी तिला घाटीत हलविण्याचा सल्ला दिला.. घाटीत उपचार सुरू होण्यापूर्वीच ती दगावली अन् नातेवाईकांनी हंबरडा फोडला. डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा महिलेचा बळी गेल्याचा आरोप होत आहे.


तरन्नुम रज्जाक शेख ( २३ रा. खंडाळा) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील तरन्नुम रज्जाक शेख (वय२३) हिला नातेवाइकांनी मंगळवारी दुपारी चार वाजता प्रसूतीसाठी वैजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डाॅक्टरांनी तिची प्रसूती केली. तिने सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाळाला जन्म दिला. डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रसूतीनंतर अचानक तरन्नुमची प्रकृती खालावली झाली. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला.


 मात्र डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे बघून तरन्नुमला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घाटीतील डॉक्टरांनी तरन्नुमच्या नातेवाईकांना सांगितले.दरम्यान तरन्नुमचा मृत्यू मंगळवारी सायंकाळी झाला.परंतु घाटीच्या डॉक्टरांनी तब्बल १५ तासानंतर म्हणजेच बुधवारी सकाळी दहा वाजता शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवला आहे. अहवाल मिळाल्यानंतर तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला? याचा उलगडा होणार आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी पोलिस चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


नावापुरतेच उरले रुग्णालय

शंभर खाटांची मिनी घाटी म्हणून ओळख असलेल्या वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय नावापुरतेच उरले आहे. प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिला रुग्णांना सिझेरियन शस्त्रक्रिया व उपचार शक्य नसल्याची भीती दाखवून त्यांना थेट  घाटीचा रस्ता किवा शहरातील खासगी दवाखान्याचा रस्ता दाखविला जातो. असा आरोप नातेवाईकांकडून होत आहे. त्यामुळे मागील एक वर्षात किती नैसर्गिक (नाॅर्मल) प्रसूती झाल्या? किती सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्या व प्रसूतीसाठी आलेल्या किती महिलांना रेफर करण्यात आले? याविषयी जिल्हा शल्यचिकित्सकांनी आकडेवरींचा आढावा घेवून संबधित हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी होत आहे. दरम्यान तरन्नुम रुग्णालयात दाखल झाली तेव्हा तिचा रक्तदाब  वाढलेला होता. त्यामुळे तो नियंत्रणात आणण्यासाठी  तिला गोळ्या दिल्या. परंतु प्रसूती होताच तिची प्रकूती खालावली. त्यामुळे ऑक्सिजन देवून डॉक्टरसोबत तिला घाटीत हलविण्यात आल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.


दीड वर्षापूर्वीच थाटला होता संसार 

तरन्नुम हिचे दीड वर्षापूर्वी ठाणे येथील रज्ज़ाक शेख यांच्यासोबत लग्न झाले होते.  तरन्नुम गर्भवती असल्याने तालुक्यातील खंडाळा येथे दोन महिन्यापासून प्रसूतीसाठी आपल्या माहेरी आलेली होती.परंतु एका गोंडस कन्येला जन्म दिल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top