विजयाचे दावे - प्रतिदावे
विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया होऊन आता नेत्यांसह, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये 'आकडेमोड' सुरू झाली आहे. सर्वच पक्षांच्यावतीने आपल्या सोयीनुसार राजकीय समीकरणे लावून विजयाचे दावे - प्रतिदावे केले जात आहे. सन २०१४ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता नेहमीच शिवसेनेच्या मागे राहिलेला वैजापूर विधानसभा मतदारसंघ यंदा कुणाला कौल देतो? दोन शिवसेनेच्या खेचाखेचित कोण बाजी मारणार? हे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे धनुष्यबाण की मशाल ? अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे. स्थानिक विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून या निवडणुकीवरच त्यांचे पुढील राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. निवडणुकीत सर्वांनीच जिवाचे रान करीत काम केले. दरम्यान निवडणूक संपताच शहरासह ग्रामीण भागात निवडणूक निकालावर चर्चा सुरू झाली असून निकालावर अनेकांनी पैजा, शर्यती लावल्या आहेत. त्यामुळे निकालाबाबत आता सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले. लोकशाहीचा हा उत्सव पाहता विविध राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांसह मतदारांची चांगलीच दमछाक झाली. साधारणतः दोन महिन्यांपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. मतदारसंघात शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा आमदार रमेश बोरनारे व उबाठा शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ दिनेश परदेशी या दोन प्रमुख उमेदवारांमध्येच 'फाईट' झाली. उर्वरित उमेदवारांची मतदारांनी फारशी 'दखल' घेतली नाही. नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहणारा विधानसभा मतदारसंघ कुणाच्या पाठीशी राहतो. याचा कल कळायला अवघड जात आहे.
सुरवातीपासूनच आमदार बोरनारे व डॉ. परदेशींचा बोलबाला सुरू होता. दोन्हीही सेनेचे स्थानिक पातळीवर पक्ष संघटन बळकट आहे. सोबतीला नेते व कार्यकर्त्यांची फौज होती. परिणामी धनुष्यबाण व मशालीत चांगलीच खेचाखेची झाल्याचे पहावयास मिळाले. उमेदवारांचा सरदारांनीही आपापल्या पक्षांच्या उमेदवारांसाठी जिवाचे रान करून प्रतिष्ठा पणाला लावत अख्खा मतदारसंघ पिंजून काढला. निवडणूक आखाड्यात वेगवेगळ्या घटकातील उमेदवार असल्यामुळे शेवटी - शेवटी जातीय समीकरणांनी जोर धरल्याचे पहावयास मिळाले. परंतु असे असले तरी संपूर्ण एक समुदाय कुणा एका उमेदवाराच्या पाठीशी होता. असे म्हणता येणार नाही. मतविभाजन येथेही झालेच. मराठा आरक्षण आंदोलनाची धग या निवडणुकीत फारशी जाणवली नाही.
निकालावर मंथन सुरू
दरम्यान विधानसभा निवडणूक संपली खरी. परंतु निवडणूक फिवर अजून उतरायला तयार नाही. निवडणुकीचे कवित्व संपले असले तरी आता निकालावर मंथन सुरू झाले आहे. नेत्यांसह कार्यकर्ते व नागरिकांनी आता आकडेमोड सुरू केली आहे. जातीनिहाय मतदारांची मोजणी करून याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होईल? याचे ठोकताळे सध्या सुरू आहे. आकडेमोड व ठोकताळे काही असले तरी यासाठी एक दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहेत. तोपर्यंत माञ निवडणूक निकालावर चर्वितचर्वण सुरू राहणार आहे. हे माञ निश्चित.
कट्ट्यावर रंगल्या चर्चा
एकीकडे निकालाची उत्सुकता तर दुसरीकडे शहरासह ग्रामीण भागात पैजा सुरू झाल्या आहेत. बोरनारेंचा धनुष्यबाण चक्रव्यूह भेदणार का? डाॅ. परदेशींची मशाल पेटणार का? एकनाथ जाधवांच्या प्रेशर कुकर शिटी वाजणार का? अशाच चर्चा शहरातील कट्टे व ग्रामीण भागातील कुचर ओट्यांवर रंगल्या आहेत.
वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर?
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत १२ टक्के मतदान जास्तीचे झाले आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत ६३.४० टक्के तर यंदाच्या निवडणुकीत ७५.९६ टक्के मतदान झाले. म्हणजेच मतदानाचा टक्का वाढला असून हा टक्का कुणाच्या पारड्यात पडणार? हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे..