Vaijapur Assembly Election 2024 | प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात 'घमासान'; 'या' दोघांत 'कांटे की टक्कर', पैशांचा 'महापूर'

0

 आ. बोरनारे व डॉ. परदेशींत रंगणार 'सामना'


 राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा धुरळा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शेवटच्या टप्प्यात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढत प्रचारात 'भरारी' घेतली आहे. वैजापूर मतदारसंघात 'सेना विरुद्ध सेना' अशीच चुरशीची लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. निवडणुकीसाठी केवळ दोन दिवस शिल्लक असल्यामुळे उमेदवारासाठी 'करा किंवा मरा' ची लढाई असणार आहे. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्रचार थंडावणार असून येत्या दोन दिवसांत साम, दाम, दंड व भेद नीतीचा अवलंब होणार आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ आॅक्टोबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना उमेदवारी देण्यासह 'बंडोबांना' थंड करण्यापासून ते नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी, रुसवेफुगवे काढण्यातच नेत्यांचा मोठा वेळ गेला.  त्यानंतर निवडणुकीची जुळवाजुळव करण्यापासून ते स्टार प्रचारकांच्या सभा, प्रचार फेऱ्या, गावसभा, शहरातील काॅर्नर सभा, प्रचाराचे नियोजन, कार्यकर्यांचे 'खानपान' ( रंगीतसंगीत) आदी सोपस्कार पार पाडताना उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागली. प्रचारादरम्यान उमेदवार व प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर उठविलेली राळ, चिखलफेक हा मतदारांसाठी चांगलाच मनोरंजनाचा विषय ठरला. विकासाच्या मुद्द्यांवर रान उठविण्याऐवजी एकमेकांवरच 'आगपाखड' करण्यातच सर्वांनीच 'धन्यता' मानली. अपवाद वगळता बहुतांश उमेदवारांकडे कोणतेही 'व्हिजन' नाही, कार्यक्रम नाही. केवळ विरोधकांवर तोंडसुख घेऊन त्यांनी तोंडाच्या वाफा गमाविल्या. परिणामी मतदारांच्या मनोरंजनापलिकडे यातून काहीच निष्कर्ष निघाला नाही. या दरम्यान बहुतांश उमेदवारांकडे कार्यकर्त्यांचा 'वाणवा' असल्यामुळे त्यांना 'एकला चलो रे' करीत निवडणूक एकहाती तारून नेण्याची नामुष्की ओढवली. अनेकांचे 'वरातीमागून घोडे निघाले' तर काहींना मतदारांना प्रलोभने दाखवून रिझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दरम्यान शिंदेसेना व महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार रमेश बोरनारे, उबाठा शिवसेना व महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. दिनेश परदेशी या दोन तुल्यबळ उमेदवारांमध्येच खरी रंगतदार लढत होणार असून प्रचार, फेऱ्या, सभा घेण्यात दोघांनीही कोणतीही कसर सोडली नाही. दोन्हीही उमेदवारांसह नेत्यांसह कार्यकर्त्यांचा जंबो फौजफाटा पाहता मतदारसंघात मोठा धुरळा उडाला. त्या तुलनेत अन्य उमेदवारांनी आपल्या 'कुवतीनुसार' प्रचारयंत्रणा राबविली. शेवटच्या टप्प्यात भाजपचे बंडखोर एकनाथ जाधव यांनी 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडे यांना वैजापूर येथे आणून 'हवा' निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरा. परंतु खरी 'हवा' मतांमध्ये परावर्तित झाली तर ती त्यांना नक्कीच मदतीची ठरेल. त्यांचे थोरले बंधू जगन्नाथ जाधव यांची उमेदवारी म्हणजे केवळ उमेदवारांमध्ये 'भर' ठरणार आहे. कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांनी लढावयाच्या सर्व निवडणुका त्यांनी लढविल्या. परंतु कुठेही यशाला 'गवसणी' घालता आली नाही. सर्वांनीच ही निवडणूक अस्तित्व व प्रतिष्ठेची केल्याने रंगत निर्माण झाली आहे. धनुष्यबाण व मशालीत कांटे की टक्कर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दोहोत आतापर्यंत घमासान झाल्याचे मतदारांना पहावयास मिळते. परिणामी आमदार बोरनारे व परदेशींनी स्वतः:च्या अस्तित्वाची लढाई करून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यात कुणाची सरशी होणार? याचा फैसला मात्र २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. 


दारू, पैशांचा महापूर 

१८ नोव्हेंबर रोजी प्रचार थंडावणार असल्यामुळे येत्या दोन दिवसांत पैशांसह दारूचा महापूर येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुतांश उमेदवारांनी 'शिधा' वाटप सुरू केला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयांभोवती 'जत्रेचे' स्वरूप प्राप्त झाले आहे. ज्या उमेदवारांकडे जनमत नाही. अशांनी थेट मतदारांची 'खरेदी' सुरू करून आदर्श आचारसंहितेचे 'धिंडवडे' काढले आहेत. शहर व ग्रामीण भागात पैसे, दारूचा महापूर आलेला असताना आचारसंहिता पथकातील सदस्य 'आदर्श' असल्याप्रमाणे 'मुग' गिळून गप्प बसले आहेत. एरवी वाहनातून लाखोंची रोकड जप्त करणाऱ्यांना पैशांचा महापूर दिसेनासा झाला आहे. त्यामुळे हे पथके धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून आहेत का? असा प्रश्नही सूज्ञ मतदार उपस्थित करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top