Vaijapur Assembly Election Analysis 2024 | 'लाडकी बहिण' ठरली 'गेमचेंजर'; 'तेच' ठरले बहिणींचे 'लाडके'

0

डॉ. परदेशींची मते वाढली 


वैजापूर विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे (MLA Ramesh Bornare)यांनी यांनी पुन्हा एकदा एकतर्फी विजयश्री खेचल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ऐन निवडणुकीत महायुतीत पडलेली फूट, भाजपमधील उफाळलेली बंडखोरी अशा सर्व घडामोडींवर मात करीत बोरनारेंनी मिळविलेला विजय नक्कीच वाखाणण्याजोगा म्हणावा लागेल. याशिवाय लाडकी बहिण योजना, मतदारसंघातील विकासकामे, मातब्बर नेत्यांची फौज आदी बाबीही त्यांच्या विजयाला हातभार लावणाऱ्या ठरल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या डॉ. दिनेश परदेशींकडेही ( Dr Dinesh Pardeshi) नेते, कार्यकर्त्यांचा मोठा 'फौजफाटा' असतानाही ते पराभव रोखू शकले नाही. त्यामुळे झालेल्या पराभवावर त्यांना चिंतन करण्याची गरज आहे. विशेषतः बोरनारेंचा गड अभेद्य ठेवण्यात 'लाडक्या बहिणीं'चा सिहांचा वाटा राहिला. त्या 'गेमचेंजर' ठरल्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

वैजापूर विधानसभा निवडणूक सुरवातीपासूनच चर्चेत राहिली. या निवडणुकीत शिवसेना महायुतीचे रमेश बोरनारे व उबाठा शिवसेना महाविकास आघाडीचे डॉ. दिनेश परदेशी हे दोन प्रमुख उमेदवार होते. निवडणूक रणधुमाळीत दोन्हीही उमेदवारांत लढत झाली. वैजापूरचा आमदार कोण? याबाबत शेवटपर्यंत मतदारांना ठाव लागायला तयार नव्हता. परंतु निकालानंतर ही निवडणूक अटीतटीची न होता जवळपास काहीशी एकतर्फी झाल्याचे समोर आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोरनारेंसाठी सभा घेतली. त्याची फलनिष्पत्तीही झाली. असे म्हणावे लागेल. याशिवाय गेल्या अडिच वर्षांतील मतदारसंघातील विकासकामांचा धडाका, लाडकी बहिण योजना व प्रत्येक गावांतील नागरिकांशी असलेला दांडगा संपर्क, मुख्यमंत्र्यांचे 'राईट हॅंड' असल्याने मतदारसंघात आलेला ३००० कोटींचा निधी, याशिवाय ठाकरेसेनेतून बाहेर पडलेले माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, अभय पाटील चिकटगावकर, बाबासाहेब जगताप, संजय निकम, साबेरखान, डॉ. राजीव डोंगरे आदी मातब्बरांसह कार्यकर्त्यांची फौज पाहता या बाबी त्यांच्या विजयासाठी तारक ठरल्या. नरेंद्र मोदी लाट व मुख्यमंत्र्यांनी राज्यात केलेली विकासकामेही त्यांच्या पथ्यावर पडली. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 


नव्याने उभारण्यात येणारा साखर कारखाना, रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेची कर्जमाफी व अन्य केलेली विविध कामांमुळे त्यांचा विजय सुकर झाला अन् बोरनारेंनी पुन्हा एकदा बाजी मारली. बोरनारेंनी वैयक्तिक पातळीवर जाऊन कुणावरही टीका केली नाही तर चिकटगावकरांसारखा पट्टीचा बोलणारा वक्ताही त्यांच्याकडे असल्याने त्यांना मैदान मारणे जास्त सोपे झाले. बोरनारेंना गेल्या विधानसभा निवडणुकीतही ९७ हजार ६२५ मते घेऊन विक्रम केला होता. यंदाही त्यांनी १ लाख ३३ हजार ६२७ अशी विक्रमी मतदान घेऊन 'विक्रमादित्य' ठरत त्यांनी त्यांचाच मागील विक्रम मोडीत काढला. दुसरीकडे उबाठा शिवसेना महाविकास आघाडीचे डॉ. दिनेश परदेशी यांच्याकडे नगरपालिकेच्या माध्यमातून २५ वर्षांपासून सत्ता आहे. या माध्यमातून त्यांनी शहरात बहुतांश विकासकामे केली. याशिवाय काॅंग्रेस नेते भाऊसाहेब ठोंबरे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे पंकज ठोंबरे आदी नेत्यांची मिळालेली साथ असूनही त्यांचा पराभव रोखू शकले नाही. उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची झालेली सभाही त्यांना तारू शकली नाही. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील मित्रपक्षातील सर्व कार्यकर्ते डॉ. परदेशींच्या सोबतीला होते. परंतु एवढे सर्व मोठे पाठबळ असतांना त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. नाही म्हणायला गेल्या दोन विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत डॉ. परदेशींचे यंदा मतदान दोन पटींपेक्षा जास्त वाढले. 


यंदा त्यांनी ९१ हजार ९६९ मतांपर्यंत मारलेली मजल ही बाब दिलासादायक असली तरीही त्यांना पराभव पहावाच लागला. भाजपचे बंडखोर तथा अपक्ष एकनाथ जाधव हे निवडणुकीत 'एकला चलो रे' करीत मैदानात उतरले खरे. ते मोठ्या प्रमाणावर मते घेऊन कुणासाठी तरी 'ब्रेकर' ठरतील. असे मतदारांना वाटत असतानाच आठ हजारांपलिकडे त्यांची 'मजल' न गेल्याने आमदारकीचे स्वप्न भंगले. प्रेशर कुकरने अपुऱ्या शिट्या दिल्याने त्यांची 'डाळ' शिजली नाही. त्याखालोखाल जगन्नाथ जाधव यांचा 'नेहमीच्या' निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही मतदारांनी त्यांना 'अव्हेरले' दाखविले. त्यांना एक हजार मतांपलिकडे जाता आले नाही. दरम्यान आमदार रमेश बोरनारेंच्या विजयाने शिंदेसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व उर्जा निर्माण झाली आहे तर डॉ. दिनेश परदेशींनी या पराभवातून धडा घेत आत्मपरीक्षण करून पुढील राजकीय मार्गक्रमण करण्याची आवश्यकता आहे. 


राज्यात महायुती फॅक्टर 

राज्यातील एकंदरीतच कल पाहता महायुतीची लाट दिसून आली. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातही शिंदे व भाजप फॅक्टर चालला. निवडणुकीत त्यांनी सर्व ताकदीनिशी उतरूनही त्यांच्या पदरी अपयश आले. त्यामुळे डॉ. परदेशींना दोष देण्यात फारसा अर्थ नाही. त्यांच्या पराभवाला एकमेव ते दोषी आहे. असे म्हणण्यास नक्कीच वाव नाही. शेवटी जनतेने दिलेला तो कौल आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top