'मविआ'चीही दमदार 'आगेकूच'
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत वैजापूर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीसह महाविकास आघाडीचे मतदान वाढले आहे. एवढेच नव्हे तर या दोन्हीही पक्षांच्या उमेदवारांची मतेही वाढली आहेत. महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांनी शहरचा अपवाद वगळता ग्रामीण भागातील सर्वच गटात आपली घौडदौड कायम ठेवून महाविकास आघाडीचे डॉ. दिनेश परदेशी यांना मागे टाकले. डॉ. परदेशी त्यांना फक्त शहरात वरचढ ठरले. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही महायुतीने मतदारसंघावर आपले प्राबल्य कायम ठेवले आहे.
वैजापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या पार्श्वभूमीवर विजयी व पराभूत उमेदवारांकडून विचारमंथन सुरू असून आपण कुठे बाजी मारली अन् कुठे कमी पडलो. याचा लेखाजोखा सुरू आहे. या निवडणुकीत शहरात उबाठा शिवसेना महाविकास आघाडीचे डॉ. दिनेश परदेशींनी आपले वर्चस्व कायम ठेवून झालेल्या एकूण २६ हजार ३८२ मतांपैकी १४ हजार ७९६ मते घेतली तर त्याखालोखाल शिंदेसेना महायुतीचे आमदार रमेश बोरनारे यांनी दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच ११ हजार ५८६ मते घेतली. ३२२० मते डॉ. परदेशींनी बोरनारेंपेक्षा जास्त घेतली.
वास्तविक पाहता शहरात डॉ. परदेशींनी जास्त मताधिक्य मिळेल. अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु तसे झाले नाही. ग्रामीण भागाबरोबरच शहरातही बोरनारेंनी चांगल्यापैकी 'शिरकाव' करून डॉ. परदेशींना मात दिली. उर्वरित मतदारसंघात गंगापूर तालुक्यातील ५३ गावांसह ग्रामीण भागातील सर्वच गटांमध्ये बोरनारेंनी डॉ. परदेशींपेक्षा मतांची आघाडी घेत जोरदार 'धनुष्यबाण' चालविला. बोरनारेंच्या धनुष्यबाणापुढे डॉ. परदेशींची मशाल फार 'प्रज्वलित' झाली नाही. बोरनारेंना १ लाख ३३ हजार ६२७ तर डॉ. परदेशींना ९१ हजार ९६९ मते मिळाली. याशिवाय गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीचीही मते वाढली आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंना ९३ हजार २३१ मते तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंना ५६ हजार २०७ व एमआयएमचे इम्तियाज जलील यांना तिसऱ्या क्रमांकाची म्हणजेच २५ हजार २१३ मते मिळाली होती. भुमरेंना खैरेंपेक्षा ३७ हजार ०२४ मतांचे मताधिक्य मिळाले होते. परंतु लोकसभा निवडणुकीत आमदार बोरनारे व डॉ. परदेशींनी एकाच तंबूत राहून भुमरेंचे काम केले होते.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. परदेशींनी उबाठा शिवसेनेत उडी मारली. त्यामुळे महायुतीच्या मतांचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होईल. असा कयास होता. परंतु तसे झाले नाही. उलट दोन्हीही पक्षांच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीत जास्तीची मते घेतली. मतदारसंघात भुमरेंनी खैरैंपेक्षा ३७ हजार ०२४ मताधिक्य घेतले. त्यापेक्षाही बोरनारेंनी डॉ. परदेशींपेक्षा ४१ हजार ६५८ मतांनी मताधिक्य घेतले. डॉ. परदेशींनी सन २००९ व २०१४ च्या निवडणुकीपेक्षा जास्त मते या निवडणुकीत घेतली तर बोरनारेंनीही सन २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षाही जास्त मते घेतली. त्यांनी गेल्या निवडणुकीत ९७ हजार ६२५ तर यंदाच्या निवडणुकीत १ लाख ३३ हजार ६२७ मते घेऊन पुन्हा 'विक्रमी' विजय मिळवला. गेल्या विधानसभा निवडणुकीत आ. बोरनारेंना जितकी मते मिळाली जवळपास तेवढीच मते भुमरे यांना मिळाली होती.
मतदारसंघात युतीचेच प्राबल्य
लोकसभा निवडणुकीत वैजापूर विधानसभा मतदारसंघात सेना - भाजप युतीच्या उमेदवारास ९३ हजार २३१ मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या उमेदवारास ५६ हजार २०७ मते मिळाली. विधानसभा निवडणुकीतही महायुतीच्या बोरनारेंना १ लाख ३३ हजार ६२७ मते मिळाली. याचाच अर्थ मतदारसंघात सेना - भाजप युतीचे प्राबल्य असल्याचे दिसून आले. म्हणजेच मतदारसंघात युतीचे एक लाखांपेक्षा अधिक मतदान आहे. हेच येथे अधोरेखित होते.