सर्वांनीच केले विजयाचे दावे
राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी शहरासह ग्रामीण भागात शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराची सांगता केली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला धुरळा आज थांबला असून येणारी रात्र उमेदवारांसाठी वैऱ्याची असणार आहे.
वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनी जिवाचे रान करीत हायटेक प्रचार यंत्रणा राबविली. आरोप - प्रत्यारोपांच्या फैरीमुळे मतदारसंघात धुराळा उडाला. निवडणूक प्रचारात सर्वच उमेदवारांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने शेवटच्या टप्प्यात निवडणुकीत रंग भरला गेला. शिंदेसेना महायुतीच्या आमदार रमेश बोरनारे व उबाठा शिवसेना महाविकास आघाडीचे डॉ. दिनेश परदेशी या दोघांनीही एकमेकांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.
त्यामुळे सुरवातीपासूनच दुरंगी वाटणाऱ्या या लढतीचे चित्र शेवटपर्यंत कायम राहीले. भाजपचे बंडखोर एकनाथ जाधव, प्रहार जनशक्ती पक्षाचे जगन्नाथ जाधव, अपक्ष ज्ञानेश्वर घोडके, वंचित बहुजन आघाडीचे किशोर जेजुरकर आदींसह एकूण १० उमेदवार निवडणूक आखाड्यात शड्डू उतरले आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत सर्वच उमेदवारांनी जिवाचे रान करीत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वच उमेदवारांना आपल्या विजयाची खात्री आहे. निवडणुकीत बहुतांश उमेदवारांनी नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा राबविली.
शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या डॉ. परदेशींडून त्यांना रोखण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त सुरू आहे. परंतु दुसरीकडे आमदार बोरनारे व सहकाऱ्यांनी मतदारसंघ पिंजून काढीत निवडून येण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जाधव बंधूंनी शेवटच्या टप्प्यात चांगलीच रंगत आणल्याने निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. या दोन्हीही उमेदवारांनी निवडणूक प्रचार ताकदीने केल्याने अन्य उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
५३ गावांत निर्णायक मते
वैजापूर मतदारसंघात समावेश असलेल्या गंगापूर तालुक्यातील ५३ गावांमधील मतेही निर्णायक ठरणार आहे. याबाबतही मतदारांना उत्सुकता आहे. एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे या माजी मुख्यमंत्र्यांच्या वैजापूर येथे झालेल्या सभा दोन्हीही उमेदवारांना पाठबळ देऊन गेल्या.
दोघांचेही शक्तीप्रदर्शन
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. दिनेश परदेशी यांची शहरातून निघालेली जंबो पदफेरी लक्षवेधी ठरली. याशिवाय आमदार रमेश बोरनारे व सहकाऱ्यांनी शहरातून काढलेल्या पदयात्रेनेही सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
सर्वांचीच कसोटी
एकंदरीतच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान महायुतीचा धनुष्य प्रत्यंचा खेचून किती सपासप 'बाण' मारतो? महाविकास आघाडीची मशाल किती 'धगधगते'? अपक्ष एकनाथ जाधवांच्या प्रेशर कुकरची 'शिटी' किती वाजते अन् प्रहारच्या जगन्नाथ जाधवांची 'बॅट' किती 'प्रहार' करणार? याचा फैसला मात्र २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.