Crime | चक्क कपाशीच्या शेतातच फुलवली गांजाची शेती; 'एवढ्या' लाखांची झाडे जप्त

0

संजरपुरवाडीत पोलिसांची कारवाई 


 कपाशीच्या शेतात गांजाची शेती फुलविल्याचा प्रकार वैजापूर तालुक्यातील संजरपुरवाडी येथे उघडकीस आला आहे. कपाशीच्या शेतातून पोलिसांनी चार लाख ३५ हजार रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहे. १२ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी एकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


    अनिल प्रल्हाद जारवाल (रा.संजरपुरवाडी) असे शेत मालकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील संजरपुरवाडी शिवारात शेत गट क्रमांक ६५८ मधील अनिल  जारवाल याच्या कपाशीच्या शेतात गांजाची झाडे लावलेली असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, हवालदार योगेश झाल्टे, प्रशांत गीते, गणेश पैठणकर यांच्यासह मंडळाधिकारी संजय काळे, कृषी सहायक अधिकारी रवींद्र उराडे, संतोष त्रिभुवन आदींनी  दुपारी दोन वाजेच्या सुमारास तालुक्यातील संजरपुरवाडी येथील कपाशीचे शेत गाठले. 


तेथे गेल्यानंतर पथकाने एका पत्र्याच्या शेडजवळील कपाशीच्या शेतात जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी शेत मालक अथवा अन्य कोणीही व्यक्ती दिसून आली नाही. या  शेतात पथकाला कपाशीमध्ये पंधरा गांजाची झाडे दिसून आली. पथकाने या झाडांचे वजन केले असता ७२ किलो वजनाची चार लाख ३५ हजार रुपये किंमतीची झाडे असल्याची त्यांच्या निदर्शनास आले. हवालदार योगेश झाल्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल जारवाल याच्याविरुद्ध वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top