सोलापुरात पोलिसांना लागला हाती
वैजापूर तालुक्यातील ४०० कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या कांद्याचे दोन कोटी रुपये न देताच फरार झालेल्या येथील अडत व्यापाऱ्याच्या वैजापूर पोलिसांनी सोलापुरात जाऊन मुसक्या आवळल्या आहे.
सागर सुनील राजपूत (३० रा. मकरमतपूरवाडी ) असे या अटक केलेल्या अडत व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमधील साई बालाजी ट्रेडिंग कंपनीचे अडत व्यापारी सागर राजपूत यांच्याकडे दीड महिन्यापूर्वी तालुक्यातील ४०६ शेतकऱ्यांनी तब्बल दोन कोटी ५ लाख ७५ हजार ४९७ रूपयांचे कांदे विक्री केले होते. विक्री केलेल्या कांद्याच्या रकमेपोटी यातील काही शेतकऱ्यांना पुढील तारखेंचे धनादेश देण्यात आले होते. परंतु त्या - त्या तारखेचे धनादेश शेतकऱ्यांनी बॅंकेत वटविण्यासाठी टाकले असता सागर राजपूत यांच्या बॅंक खात्यावर रक्कमच नसल्याचे बॅंक व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना सांगितल्यामुळे त्यांना माघारी परतण्याची नामुष्की ओढवली. अडत व्यापाऱ्याची ही 'हेराफेरी' लक्षात आल्यानंतर दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटला टाळे ठोकले होते. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने मध्यस्थी करीत शेतकऱ्यांना पुढील वायदा देण्यात आला होता.
परंतु दीड महिन्याचा कालावधी उलटूनही अडत व्यापारी राजपूत यांनी शेतकऱ्यांची रक्कम न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी २५ नोव्हेंबर रोजी पुन्हा बाजार समिती गाठून सभापतींसह सचिवांना घेराव घातला. यामुळे बाजार समितीमध्ये एकच गोंधळ उडाला. परिणामी पोलिसांना पाचारण करून शेतकऱ्यांना आवरावे लागले. शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत बाजार समितीच्या आवारात ठिय्या देऊन बाजार समितीच्या सभापतींसह गलथान कारभाराच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केली होती. दरम्यान शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी १४ नोव्हेंबर रोजी सागर राजपूत याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून वैजापूर पोलिस त्याच्या मागावर होते.
भणक लागली अन् केले जेरबंद
अखेर २५ नोव्हेंबर रोजी तो सोलापूर येथील एका लाॅजवर असल्याची भणक पोलिसांनी लागली. त्यानुसार पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कोटाळे यांनी तात्काळ दीपक औटे, ज्ञानेश्वर मेटे यांचे पथक सोलापूरकडे रवाना करुन त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.