Vaijapur Assembly Election Result 2024 | १० उमेदवारांचा उद्या फैसला; कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला

0

 विनायकराव पाटील महाविद्यालयात मतमोजणी 


 वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून शहरातील विनायकराव पाटील महाविद्यालयात सुरू होणार असून निवडणूक आखाड्यातील १० उमेदवारांचा फैसला होणार आहे. मतदारसंघाच्या कारभारी कोण होणार?  याबाबत मतदारांची उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यान मतमोजणीच्पा पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे.

 


    वैजापूर विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. त्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष व कार्यकर्त्यांनी आकडेमोड सुरू केली. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८  वाजेपासून शहरातील विनायकराव पाटील महाविद्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अरुण जऱ्हाड व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस सुरवात केली जाणार आहे. 


तत्पूर्वी सकाळी सात वाजता विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार, प्रतिनिधींसमोर स्ट्रॉंगरुम उघडल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ करण्यात येणार आहे. सर्वप्रथम टपाली मतदान, ईटीपीबीएसद्वारे करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात येईल व त्यानंतर ईव्हीएममधील मतांच्या मोजणीस प्रारंभ करण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतमोजणीच्या एकूण  २६ फेऱ्या होणार असून यासाठी १४ टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे. याशिवाय टपाली मतमोजणीसाठी ६ टेबल असणार आहे. प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षकासह मतमोजणी सहायक,  सूक्ष्म निरीक्षक, शिपाई असे एकूण चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी ८०  कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीची प्रत्येक फेरी पूर्ण करण्यासाठी २० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. यामध्ये मतमोजणी प्रक्रियेसह नोंदी घेऊन संपूर्ण कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेऊन फेरी पूर्ण करावी लागणार आहे.


 मतदानाची संख्या कमी असल्यास ही वेळ आणखी कमी होऊ शकते. मतमोजणीच्या २६ फेऱ्यांसाठी साधारणतः पाच ते सहा तास पूर्ण लागण्याची शक्यता आहे. दुपारी चार वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत १२ टक्‍क्‍यांनी मतदानाचा टक्का वाढला. दरम्यान निवडणूक आखाड्यात शिवसेना महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे, उबाठा शिवसेना महाविकास आघाडीचे डॉ. दिनेश परदेशी, अपक्ष एकनाथ जाधव, ज्ञानेश्वर घोडके आदींसह १० उमेदवार आहेत. यापैकी कोण  बाजी मारणार.? याचा फैसला मात्र आज होणार आहे.


मोठा पोलिस बंदोबस्त तैनात 

दरम्यान  मतमोजणी केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नसून तसे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. मतमोजणी कालावधीत व मतमोजणी नंतरही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पुरेसा पोलिस बंदोबस्त, केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागात गस्त, ड्रोन, सीसीटिव्हीद्वारे गस्त वाढविण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top