Court Order | शहरातील 'ते' बेकायदा बांधकाम पाडा; न्यायालयाने दिले आदेश

0

अपार्टमेंट ॲक्ट लागू नसतांना केले बांधकाम 



 वैजापूर नगरपालिका क्षेत्रात अपार्टमेंट ॲक्ट लागू नसतांना छतावरील (गच्ची) जागेची बेकायदा खरेदी करुन बांधकाम केल्याचे शहरातील मुरारी पार्क भागात उघडकीस आले आहे. याबाबत ज्ञानेश्वर कृष्णराव धुमाळ यांच्या दुकान क्रमांक २९ वर ५३७ चौरस फुट  क्षेत्रावर करण्यात आलेले बांधकाम निकाल दिल्याच्या  दोन महिन्यांत नगरपालिकेने काढून टाकावे. असे आदेश येथील  जिल्हा व अतिरिक्त  सत्र न्यायाधिश लक्ष्मीकांत पाच्छे यांनी दिले आहेत. याबाबत न्यायालयाने मनाई हुकुम मंजूर केल्याचे न्यायालयीन आदेशात म्हटले आहे. नगरपालिकेने नागरिकांचे विश्वस्त म्हणून काम करणे अपेक्षित असल्याचे निकाल देताना म्हटले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी कि, वैजापूर शहरातील ज्ञानेश्वर धुमाळ यांनी २०११ मध्ये मुरारी पार्क परिसरातील दुकान क्रमांक २९ हे खरेदीखताआधारे खरेदी करुन त्या ठिकाणी भांडी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. परंतु नगरपालिकेत अपार्टमेंट ॲक्ट लागू नसतांनाही सपना राजेंद्र अग्रवाल व राजेंद्र अग्रवाल यांनी दुकान क्रमांक २९ ची गच्ची डॉ. योगेश करमासे यांना विक्री केली होती. मात्र डॉ.करमासे यांनी केलेले खरेदीखत व व्यवहार हा चुकीचा असल्याची नोंद घेत भूमी अभिलेख कार्यालयाने त्यांचा फेरफार नामंजूर केला होता. तसेच डॉ.करमासे यांनी दुकानाच्या वर केलेले बांधकाम हे बेकायदेशीर तसेच स्लॅबची जाडी कमी असल्यामुळे खाली असलेल्या दुकानदाराला त्रास होत होता. 


वैजापूर येथील कनिष्ठ न्यायालयाने यापूर्वीच ज्ञानेश्वर धुमाळ यांचे प्रकरण नामंजूर केले होते. या निकालाच्या विरोधात धुमाळ यांनी डॉ. योगेश अक्कर यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात योगेश करमासे, सपना राजेंद्र अग्रवाल, राजेंद्र ओमप्रकाश अग्रवाल (रा. मुरारी पार्क, वैजापूर) यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी या चौघांना प्रतिवादी करण्यात आले होते. वैजापूर येथे अपार्टमेंट ॲक्ट लागू नसतांना व अशा प्रकारे गच्ची विक्री करण्याचा व्यवहार करता येत नसल्याने भूमी अभिलेख कार्यालयाने फेर नामंजुर केला. ही बाब नगरपालिकेने मान्य केल्याचा युक्तिवाद ॲड अक्कर यांनी न्यायालयासमोर केला. हा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने अपिल मंजूर केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top